उन्हाळ्यात धुळ, पावसाळ्यात चिखल; नगरपंचायत प्रशासन सुस्त
पालघर दर्पण: वार्ताहर
वाडा: गेल्या अनेक वर्षांपासून वाडा शहरातील नागरिक येथील विविध नागरी समस्यांना तोंड देत आहेत. या समस्यांमध्ये येथील अंतर्गत रस्त्यांच्या मोठ्या समस्येनी येथील नागरिकांना ग्रासले आहे. या रस्त्यांची इतकी दुरावस्था झाली आहे की, उन्हाळ्यामध्ये या रस्त्यांवर असलेल्या खडीने व धुळीने नागरिक हैराण झाले आहेत, तर पावसाळ्यात चिखलाने बरबटलेल्या रस्त्यातून वाट शोधता शोधता नाकीनऊ येत आहेत. वाडा नगरपंचायत स्थापना होऊन पाच वर्ष झाली आहेत, मात्र या पाच वर्षांत येथील अनेक समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला यव आलेले नाही.
या रस्त्यांच्या दुरावस्थे बाबत येथील नगरपंचायत प्रशासन सुस्त आहे. तर या प्रशासनावर अंकुश ठेवणारे, जनतेने निवडून दिलेले पदाधिकारी आपल्या स्वताच्या कामात व्यस्त असल्याने त्यांना येथील नागरी समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नसल्याचे येथील नागरिकांकडून बोलले जात आहे.
भिवंडी लोकसभा व भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात वाडा शहराचा समावेश आहे. गेत्या सात वर्षांपासुन येथे प्रतिनिधित्व करणारे खासदार कपिल पाटील (भाजपा) व आमदार शांताराम मोरे (शिवसेना) यांनी गेल्या सात वर्षांत या शहराच्या विकासासाठी किती प्रयत्न केलेत हा एक संशोधनाचा विषय ठरेल. या लोकप्रतिनिधींकडे त्या, त्या पक्षांतील कार्यकर्त्यांनी येथील समस्या सुटण्यासाठी किती पाठपुरावा केला, व केला असेल तर त्याची दखल का घेतली नाही हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
वाडा शहरात शिवाजीनगर, शास्रीनगर, गायत्रीनगर, गणेशनगर, विवेकनगर, सोनारपाडा रोड, पाटील आळी रोड, आगर आळी रोड असे अनेक अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था भयानव आहे. या सर्व रस्त्यांची मिळून एकूण लांबी अवघी सहा ते सात किलोमीटर इणकी आहे. या सात किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या डांबरीकरण अथवा काॅक्रीटी करणासाठी येथील लोकप्रतिनिधींना तसेच नगरपंचायत प्रशासनाला निधी उपलब्ध करता येत नसेल तर हे येथील नागरिकांचे दुर्दैव आहे.
◾ग्रामपंचायत तरी बरी होती
एप्रिल 2016 मध्ये वाडा ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायत मध्ये करण्यात आले. मात्र गेल्या पाच वर्षांचा नगरपंचायतीचा विकासाचा वेग पहाता ग्रामपंचायत तरी बरी होती असे येथील नागरीकांकडून बोलले जात आहे.
गेल्या चार वर्षांपासून नगरपंचायत मध्ये शिवसेनेची सत्ता आहे. राज्याचे नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे आहेत, असे असतानाही ठाण्यापासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर असलेली वाडा नगरपंचायत अनेक सोयी, सुविधांपासून वंचित राहिली आहे हेही एक विशेष असल्याचे बोलले जात आहे.
◾ प्रशासक म्हणून गेल्या चार महिन्यांपासून पदभार माझ्याकडे आहे, या कालावधीत काही विकासात्मक कामे सुरु झाली आहेत.
— डॉ. उद्धव कदम, तहसिलदार वाडा, तथा प्रभारी मुख्याधिकारी, नगरपंचायत वाडा.
◾गेल्या पाच वर्षांत वाडा नगरपंचायतीला विकास आराखडा सादर करता आलेला नाही, मग विकास कसा होणार.
— अनंत सुर्वे – ग्रामस्थ, वाडा.
◾ गेल्या पाच वर्षांत पुर्णवेळ मुख्याधिकारी नगरपंचायतीला न मिळाल्याने येथील विकास कामे रखडली आहेत.
— वर्षा गोळे, उपनगराध्यक्षा, नगरपंचायत वाडा.