सव्वा एकर जागेत दीड हजार रोपांची लागवड; तोक्ते वादळामुळे शेवग्याचा पहिला हंगाम वाया
पालघर दर्पण: वार्ताहर
मनोर: मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या सावरखंड गावातील एका आदिवासी शेतकऱ्यांने खडकाळ जमिनीत शेवगा लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे.तालुक्यातील शेवगा लागवडीचा पहिला प्रयोग असून सव्वा एकरच्या क्षेत्रात दीड हजार ओडिसी जातीच्या शेवग्याच्या रोपांच्या लागवड केली आहे.शेतीची मशागत,लागवड आणि सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांना दीड लाखांचा खर्च आला असून वर्षाला तीन ते चार लाख लाखांचे उत्पन्न मिळणार असल्याची माहिती शेतकरी किरण गोवारी यांनी दिली. शेवग्याच्या शेंगांचे उत्पादन सुरू झाले असताना तोक्ते वादळाने झाडावरील फुलोरा गळून पडल्याने यंदाचा हंगाम वाया गेला आहे. पुढच्या हंगामात नुकसान भरून निघण्याची आशा त्यांनी व्यक्त केली.
वनहक्क दाव्यातून मिळालेल्या दीड एकरमध्ये शेतीत सरळ रेषांमध्ये 12 फुटांचे तर सरळ रेषेत सहा फुटाच्या अंतरठेऊन दोन रोपांची एक फुटाच्या अंतरात लागवड करण्यात आली आहे. एक मीटर लांबीच्या शेंगा लागणाऱ्या 1500 ओडिसी जातीच्या शेवग्याच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात शेवग्याच्या रोपांची लागवड करण्यात आली होती.रोपांना ठिबक सिंचन पद्धतीची सिंचन व्यवस्था तयार करण्यात आली असून आवश्यकते नुसार आठवड्यातून दोन वेळा रोपांना पाणी दिले जाते.गरजेचनुसार खताची मात्रा दिल्याची माहिती शेतकरी किरण गोवारी यांनी दिली.लागवडी नंतर पहिल्या महिन्यात रोपांवर लष्करी आळी आणि ग्रास कटरचा प्रादुर्भाव झाला होता. खबरदारी घेत कीटकनाशकांची फवारणी करून लष्करी आळी आणि कटरचा प्रादुर्भाव कमी झाला.महिन्यात एकदा गरजेनुसार कीटकनाशक फवारणी करावी लागते.फवारणी खर्च दीड हजारांपर्यंत जातो.
नोव्हेंबर महिन्यात लागवड केल्यानंतर तीन महिन्यांनी रोपांची छाटणी करण्यात आली. त्यानंतर आलेल्या फुटव्यांची छाटणी करीत गेल्यानंतर रोपांना अनेक फुटवे येऊन रोपांचा डोलारा वाढत गेला.लागवडीच्या सात महिन्यांनी झाडे सात फूट उंच झाली आहेत.
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पासून एक तृतीयांश झाडांना शेंगा लागून काढणी लायक झाल्या असताना तोक्ते वादळात झालेला मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने शेवग्याच्या झाडांना आलेली फुलोरा गळुन पडला, त्यामुळे शेवग्याच्या लागवडीनंतरचा पहिला हंगाम वाया गेला आहे.
■ शेवग्याच्या एका झाडापासून पहिल्या वर्षी पाच किलो शेंगा, दुसऱ्या वर्षी उत्पादन दुप्पट होऊन दहा किलो शेंगा मिळणार आहे. शेवग्याच्या झाडाचे आयुर्मान वीस वर्षाचे आहे, परंतु दहा वर्षांनी शेवग्याच्या झाडाची लागवड काढून टाकून नवीन लागवड करणार असल्याची माहिती शेतकरी किरण गोवारी यांनी दिली. शेवग्याच्या शेतीत आंतरपीक म्हणून झेंडू लागवड करण्यात आली होती.
■ बाजारपेठेत शेवग्याच्या शेंगांना प्रतिकिलो 60 रुपयांचा दर अपेक्षित धरून लागवड,ठिबक सिंचन आणि काढणी खर्च वगळता तीन ते साडे तीन लाख रुपये उत्पन्न मिळण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
■ पालघर तालुक्यात शेवगा लागवड शेताच्या बांधावर केली जाते.आदिवासी शेतकऱ्यांने लागवड केलेल्या शेवगा शेतीची पाहणी करण्यात येईल.तसेच या शेतकऱ्याला शासकीय अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
— तरुण वैती,
तालुका कृषी अधिकारी, पालघर