◾ महावितरणाची 66 ग्रामपंचायतींना नोटीस; सात कोटी सहा लाखांची दिवाबत्तीची थकबाकी शिल्लक
पालघर दर्पण: विषेश प्रतिनिधी
पालघर: महावितरणाच्या बोईसर उपविभाग अंतर्गत येणाऱ्या अनेक ग्रामपंचायतीची दिवाबत्ती बंद होण्याच्या मार्गावर आहे. रस्त्यावर असलेल्या पथदिव्याचे विद्युत देय थकवत कोट्यवधी रूपयाची थकबाकी असल्याने महावितरणाने कारवाईची नोटीस ग्रामपंचायतींना बजावली आहे. यामुळे येणाऱ्या काही दिवसांत ग्रामपंचायतीने थकबाकी न भरल्यास अनेक गावातील रस्ते अंधारमय होणार आहेत.
ग्रामपंचायती हद्दीत मुख्य रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या पथदिव्याचे विद्युत देय ग्रामपंचायतींनी थकवल्याने महावितरणाने ग्रामपंचायतींना नोटीस बजावल्या आहेत. महावितरणाच्या बोईसर उपविभागात येणाऱ्या एकुण 66 ग्रामपंचायतींनी 7 कोटी सहा लाखांचे विद्युत देय थकवल्याने तातडीने विद्युत देय न भरल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे थकबाकी असणाऱ्या ग्रामपंचायतीचे रस्ते अंधारमय होणार आहेत. यापुर्वी जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून प्रत्येक ग्रामपंचायतीचे पथदिव्याचे विद्युत देय भरले जात होते. मात्र 16 मे 2018 रोजी शासानाने काढलेल्या अध्यादेशा नुसार 50 टक्के रक्कम ग्रामपंचायतीने भरणा करायची असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतींंनी विज थकबाकी कडे दुर्लक्ष केल्याने थकबाकीची रक्कम वाढत गेली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उर्जा विभागाने कोट्यवधी रूपयाची ग्रामपंचायतींच्या दिवाबत्तीची थकबाकी वाढल्याने 16 मे 2018 रोजी अध्यादेश काढुन 31 मार्च 2018 पर्यंतच्या 50 टक्के रक्कमेवर विक्त आयोगाच्या निधीतून ग्रामविकास विभागाने महावितरणाला थेट रक्कम अदा करण्याचे आदेश दिले होते. त्यातच उरलेली 50 टक्के रक्कम ग्रामपंचायतीने भरणा करावी असे म्हटले होते. मात्र ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष करत कोणत्याही प्रकारची रक्कम महावितरणा कडे भरणा केलेली नसल्याने आता कारवाईची टांगती तलवार ग्रामपंचायतींवर आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायत नागरीकांन कडुन त्यांच्या घराच्या कर पावती मध्ये दिवाबत्ती कर वसुल करते. असे असले तरी हा कर नेमका कुठे खर्च केला जातो हा मोठा प्रश्न उपस्थित होतो. ग्रामपंचायतींनी जरी विज भरणा करण्याकडे दुर्लक्ष केले असल्याने नागरीकांना मात्र कर भरून देखील पथदिवे बंद झाल्यावर गैरसोईला सामोरे जावे लागणार आहे.
◾ कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याने ग्रामपंचायतींंना नोटीस देण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने दिलेल्या नोटीसी प्रमाणे वीज बिल भरणा न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
— रूपेश पाटील, उप कार्यकारी अभियंता महावितरण बोईसर उप विभाग