तहसीलदारांच्या आश्वासनानंतर उपोषण घेतले मागे
पालघर दर्पण: वार्ताहर
विक्रमगड: वाडा शहरातील शिवाजीनगर या भागातील मुख्य मार्ग अनेक वर्षांपासून दुरावस्थेत असून या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळाला असला तरी होणं असलेले काम कासवगतीने व निकृष्ट दर्जाचे होत आहे असा आरोप केला जात आहे. सोमवारी वाडा तहसीलदार कार्यालयाच्या समोर याबाबत रहिवाश्यांनी उपोषण सुरू केले असून याबाबत कारवाईची मागणी केली जात आहे.
शिवाजीनगर भागातील जवळपास 181 मीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण कामाला मंजुरी मिळाली असून याआधी पाण्याच्या पाईपलाईनचे स्थलांतर करण्याच्या कामाला 3 मे रोजी सुरुवात झाली. महिनाउलटला तरी या महत्त्वाच्या मुख्य भागातील रस्त्याच्या कामाला वेग येत नसून लोकांना याचा मनस्ताप सहन करावा लागला असे रहिवाशी सांगतात. पाण्याच्या लाईन स्थलांतरित करण्याचे काम निकृष्ट व बेजाबदरपणे करण्यात आले असून यात लोकांना स्वतः पदरमोड करून आपले काम पूर्ण घ्यावे लागले असून याबाबत उपनागराध्यक्षा वर्षा गोळे यांनी निवेदन देखील सादर केले होते.
रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला महिना उलटल्याने जेमतेम सुरुवात झाली असून सुरू असलेले काम निकृष्ट असल्याचा आरोप रहिवाश्यांनी करीत याबाबत सोमवारपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. सुरू असलेला मार्ग हा खरेतर अपूर्ण व अर्धवट असला तरी चार नगरांशी जोडणारा हा रस्ता अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मंजूर झाल्याने आनंदाचे वातावरण पसरले होते मात्र निकृष्ट कामामुळे या कामाबाबत संताप व्यक्त करण्याची वेळ असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.