◾पालघर दर्पणच्या सतर्कतेमुळे अवधनगर येथील केमिकल माफियांचा ट्रक मनोर पोलिसांनी घेतला ताब्यात; बेटेगाव तपासणी चौकीवरून कागदपत्रे नसलेला केमिकल माफियांचा ट्रक सोडण्यात आले होता
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्यातील घातक रसायन बेकायदेशीर विल्हेवाट लावण्यासाठी घेवून जाणाऱ्या ट्रक वर मनोर पोलिसांनी कारवाई केली आहे. अवधनगर येथील केमिकल माफियांचा ट्रक तपासणी न करताच बेटेगाव चौकीवरून सोडल्याची खात्रीलायक माहिती पालघर दर्पण कडे प्राप्त झाली होती. त्यानंतर मनोर पोलिस बेकायदेशीर रसायन वाहतूक करणारा ट्रक चिल्हार बोईसर रस्त्यावरील चरी फाट्यावरून मंगळवारी सायंकाळी मनोर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
तारापूर औद्योगिक वसाहती मधून घातक रसायनाचे ड्रम असलेला ट्रक बेकायदेशीर पणे विल्हेवाट लावण्यासाठी जात असल्याची माहिती मंगळवार 15 जून रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पालघर दर्पण टिमकडे खात्रीलायक सुत्रांकडून प्राप्त झाली होती. बेटेगाव चौकीवर सुरू असलेल्या तपासणी नाक्यावरून हे वाहन पुढे गेले होते. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नसलेल्या वाहनाची साधी चौकशी देखील करण्यात आलेली नव्हती. बेकायदेशीर घातक रसायनाची वाहतूक होत असल्याची माहिती मनोर पोलिसांना तातडीने देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी चिल्हार बोईसर रस्त्यावरील नागझरी नाक्यावर सापळा रचला होता. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास चिल्हार बोईसर रस्त्यावरील चरी फाट्यावर वाहन क्रमांक एमएच 04 इवाय 5517 ट्रक पोलिसांनी कडून अडविण्यात आला. घातक रसायन भरलेला ट्रक चालकाकडे रसायनाच्या वाहतुकीसाठी वैद्य कागदपत्रे नसल्याने ट्रक मनोर पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आला आहे.
मनोर पोलिसांनी पकडलेल्या वाहनात अवधनगर येथील “वाहाब” नावाचा केमिकल माफियांचा रसायनाचा साठा विल्हेवाट लावण्यासाठी घेवून जात असल्याचे समोर आले आहे. मनोर पोलिसांनी रसायन भरलेले वाहन व चालकाला ताब्यात घेतले असून यामध्ये घातक रसायन भरलेले 44 ड्रम आहेत. यातील रसायनाचे नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. मनोर पोलिस ठाण्यात बेकायदेशीर रसायन वाहतूक बाबत कारवाई सुरू करण्यात आली असून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.