घातक घनकचरा विल्हेवाट लावणाऱ्या टोळ्या सक्रिय; महामार्गावर रात्रीच्या वेळी निर्जन भागात टाकले जात आहेत घातक रसायन
पालघर दर्पण: वार्ताहर
मनोर: मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या निर्जन भागात रात्रीच्या वेळी घातक रासायनिक पदार्थांची विल्हेवाट लावण्याचे प्रकार सुरू आहेत.रात्रीच्या वेळी महामार्गाच्या निर्जन भाग घनकचऱ्यांच्या गोण्या टाकण्यासाठी निवडला जात आहे. तारापूर आणि गुजरात औद्योगिक वसाहती मधील घातक घनकचऱ्याच्या गोणी केमिकल माफियांकडून पालघर तालुक्यातील कुडे,सातीवली आणि वसई तालुक्यातील भारोळ आणि सकवार गावच्या हद्दीत टाकण्यात आल्या आहेत.रसायनिक पदार्थ असलेल्या गोण्यांवर पाऊस पडल्याने रसायनातून वाफा आणि उग्र वास येत असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ हैराण झाले आहेत.घातक रसायन टाकून ग्रामीण भागात प्रदूषण पसरवणाऱ्या केमिकल माफियांवर कारवाईची मागणी पुढे येत आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या गुजरात मार्गिकेवरील कुडे,सातीवली,भारोळ आणि सकवार गावच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून रस्त्यालगत रासायनिक कारखान्यांमधून निघणारे घातक रसायनाची विल्हेवाट लावण्यासाठी टाकले जात आहे.तारापूर औद्योगिक वसाहत आणि गुजरात राज्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये सक्रिय असलेले केमिकल माफिया रात्रीच्या वेळी ट्रक मधून घातक रसायन घेऊन निघतात,त्यानंतर महामार्गालगत निर्जन जागा पाहून गोण्यांची विल्हेवाट लावली जाते.
मुंबई अहमदाबाद महामार्गालगत रात्रीच्या वेळी घातक रसायनाची बेकायदेशीर विल्हेवाट लावणाऱ्या केमिकल माफियांच्या काही टोळ्या सक्रिय आहेत.गेल्या वर्षी मनोर पोलिसांनी बनावट चलनाच्या सहायाने घातक रसायनाची वाहतूक करणारा टेम्पो मनोर पोलिसांनी जप्त केला होता. मनोर वाडा रस्त्यालगत अंभई,सापणे आणि महामार्गावरील आवंढाणी गावच्या हद्दीत घातक द्रव स्वरूपातील रसायन सोडल्याचे प्रकार उघडकीस आले होते.महामार्गावरील ढेकाळे गावच्या हद्दीतील वाघोबा खिंडीत मोठ्या प्रमाणात कचऱ्याच्या गोणी टाकल्या जात आहेत.
महामार्गालगतच्या निर्जन भागात घातक रसायन टाकले जात असल्याने महामार्गालगतचे पाण्याचे नैसर्गिक स्रोत दूषित होत आहेत.तसेच लगतची शेतजमीन कायमस्वरूपी नापीकी होण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.घातक रसायनाची विल्हेवाट लावली जात असल्याने ग्रामीण भागात प्रदूषणाची समस्या निर्माण होणार असून घातक रसायनाची विल्हेवाट लावण्याचे प्रकार वाढत आहेत.त्यामुळे ग्रामीण भागातील सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.केमिकल माफियांवर कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे.
■ ग्रामीण भागातील प्रदूषण रोखण्यासाठी महामार्गालगत टाकलेल्या रसायनाच्या गोणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ताब्यात घेऊन रसायनाची तळोजा स्थित मुंबई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.
■ महामार्गालगत टाकलेल्या घातक रसायनाची क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पाठवून माहिती घेतली जाईल. त्यानंतर कारवाई करण्यात येईल.
— डॉ. राजेंद्र राजपूत,प्रादेशिक अधिकारी,
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ.
■ आमच्या ग्रामपंचायत हद्दीत बेकायदेशीर रित्या घातक रसायन सोडणाऱ्या केमिकल माफियांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक पोलीस ठाण्यात करण्यात येणार आहे.
— नलिनी श्रावणे
माजी सरपंच,सातीवली ग्रामपंचायत.