◾तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखानदारांचा प्रताप उघड; सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून काढलेल्या घातक गाळ व कारखान्यातील रासायनिक घनकचऱ्यांची विल्हेवाट
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका रासायनिक कारखानदारांने रासायनिक घनकचरा जमिनीत पुरला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारखान्यातील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून निघालेला गाळ व कारखान्यातील रासायनिक घनकचरा हा कारखान्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत पुरला आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला माहिती देवुन सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भारत केमिकल्स प्लाँट नंबर- एल 13 आणि एल 30 या रासायनिक कारखान्यातून 14 जून रोजी दुपारच्या वेळी सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून व कारखान्यात साठवलेला रासायनिक घनकचरा विल्हेवाट लावण्यात आला. कारखान्यांच्या मागच्या बाजूला बगिचा साठी असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या राखीव भुखंडावर खड्डा खोदून हा रासायनिक घनकचरा याठिकाणी पुरण्यात आल्याचे दिसून आले. कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर देखील मोठ्या प्रमाणात रासायनिक घनकचरा ठेवल्याचे दिसून आले होते. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी व उपप्रादेशिक अधिकारी यांना माहिती देवुन सुध्दा एकही अधिकारी याठिकाणी फिरकला नाही. विशेष म्हणजे याबाबत पालघर दर्पण कडे माहिती मिळाल्यानंतर उपप्रादेशिक अधिकारी मनिष होळकर यांना संपर्क साधला असता त्यांनी या कारखान्यांची तक्रार करा मग कारवाई करता येईल असे अजब उत्तर दिले. यामुळे अशा रासायनिक कारखान्यांवर कारवाई होऊ नये यासाठी वरिष्ठ स्थरावरून दबाव तर नाही असा सवाल उपस्थित होत आहे.
कारखान्यातुन निघणारा कोणताही रासायनिक घनकचरा व सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील घातक रासायनिक गाळ हा मुंबई वेस्ट मँनेजमेंट कडे पाठवणे बंधनकारक आहे. मात्र त्याठिकाणी असलेली खर्चिक प्रक्रिया टाळण्यासाठी केमिकल माफियांना हाताशी घेवून रासायनिक घनकचऱ्यांची विल्हेवाट लावली जात असली तरी प्रशासन मात्र डोळे बंद करून बसलेले दिसून येते. भारत केमिकल्स या कारखान्यातुन विल्हेवाट लावण्यासाठी काढलेला रासायनिक घनकचरा हा येथील एका स्थानिक ठेकेदाराने जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून याठिकाणी पुरला आहे. याच ठेकेदार याठिकाणाहुन निघणारा घातक रासायनिक घनकचरा नेहमीच विल्हेवाट लावत असल्याची माहिती खात्रीशीर सुत्रांकडून समोर आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी देखील या प्रदूषणकारी कारखान्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे कारखानदारांचे फावत चालले आहे. रासायनिक घनकचरा खड्ड्यात पुरणाऱ्या कारखानदारांवर व ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरिकांन कडून केली जात आहे.
◾ मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग लगत रासायनिक घनकचरा टाकल्याचे दोन दिवसापूर्वी उघड झाले होते. यासाठी टाकलेल्या रासायनिक घनकचरा मधून पाऊस पडल्याने धुर निघल्याचे देखील दिसून येत होते. त्याठिकाणी देखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तपासणी साठी नमुने अद्यापही घेतलेले नाही. भारत केमिकल्स मधून देखील अशाच प्रकारचा रासायनिक घनकचरा पुरण्यात आला असल्याने महामार्ग लगत टाकलेला रासायनिक घनकचरा हा याच कारखान्यातील तर नाही ना असा संशय व्यक्त केला जात आहे.