◾बनावट अपघात घडवून घेतली शासकीय यंत्रणेची फिरकी
पालघर दर्पण: वार्ताहर
मनोर: तारापूर औद्योगिक वसाहती मधील नवापूर रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी मनसे कडून अनोख्या पद्धतीचे आंदोलन करून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला जाब विचारण्यात आला. बुधवारी (ता.16) दुपारी बनावट अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची माहिती संबंधित विभागाला देण्यात आली होती.माहिती दिल्यानंतर अपघातस्थळी कोणीही पोहोचले नाही,याचा संताप व्यक करीत मनसे कडून आंदोलन करण्यात आले. औद्योगिक विकास महामंडळाकडून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम तात्काळ सुरू करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.आंदोलनामुळे नवापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
बुधवारी दुपारी साडे वाजताच्या सुमारास नवापूर रस्त्यावर महाराष्ट्र हार्डवेअर समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष समीर मोरे यांनी त्यांच्या कार समोर दोन दुचाकी आडव्या पाडून ठेवल्या होत्या.यातील दुचाकीस्वार कार खाली येऊन झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव निर्माण केला होता.या बनावट अपघाताची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि बोईसर पोलीस ठाण्याला दिली होती. अपघाताची माहिती देऊन तासाभराचा वेळ उलटूनही औद्योगिक विकास महामंडळाचे अभियंता आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नाही.याचा मनसे कडून संताप व्यक करीत नवापूर रस्त्यावर आंदोलन घेण्यात आले होते. त्यामुळे नवापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
औद्योगिक विकास महामंडळाच्या अभियंत्यांना सर्वसामान्य जनतेच्या जीवाची पर्वा नाही.त्यामुळे रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप मनसेच्या वतीने यावेळी करण्यात आला. नवापूर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी औद्योगिक विकास महामंडळाच्या अभियंता संदीप बडगे यांच्याकडे करण्यात आली.त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात सिद्धेश महाले,नवल मोरे,अमित गावड, साहिल मोरे,हर्शल ठाकुर,मयूर पाटील,विक्रांत मोरे आणि मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
■ दोन दिवसांपूर्वी खड्डे बुजविण्याच्या कामाचा कार्यादेश मिळाला आहे.त्यानुसार मधुर हॉटेल पासून खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अशी माहिती औद्योगिक विकास महामंडळाचे अभियंता संदीप बडगे यांनी दिली.