◾ बंद करण्यात आलेल्या कारखान्यात साठवला घातक रसायनाचा साठा; पालघर दर्पणने उघड केली चोरटी वाहतूक
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर मधील नेहमीच प्रदूषणास अग्रेसर असलेल्या बजाच हेल्थकेअर कारखानदारांने पुन्हा बेकायदेशीर रसायनाची वाहतूक केल्याचे उघड झाले आहे. याबाबत पालघर दर्पण कडे माहिती मिळताच त्यांनी बोईसर पोलिसांच्या हा प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिसांनी कारखान्यांची पाहणी केली. तसेच वाहनात असलेला रसायनाचासाठा तसाच ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लाँट नंबर- टी 30 या बजाज हेल्थकेअर कारखान्यावर प्रदूषण प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली होती. याठिकाणी साठवून ठेवलेल्या घातक रसायनाचा साठा शुक्रवारी 18 जून रोजी कारखानदारांने आपल्या प्लाँट नं. एल 9/3 याठिकाणी बंद असलेल्या कारखान्यात बेकायदेशीर पणे वाहन क्रमांक एम एच 48 बीएम 0413 मधून वाहतूक करून नेत असताना निदर्शनास आला आहे. याबाबत पालघर दर्पणने बोईसर पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. बोईसर पोलिसांनी बजाज हेल्थकेअर च्या प्लाँट नं. एल 9/3 मध्ये तपास केला असता त्याठिकाणी वाहना सोबत कोणत्याही प्रकारची अधिकृत कागदपत्रे आढळून आलेली नव्हती.
बजाज हेल्थकेअर कारखान्याच्या प्लाँट नंबर- एल 9/3 याठिकाणी पोलिसांनी वाहन तपासणी केल्यानंतर साधारण तासाभराने कारखान्याचे व्यवस्थापक यांनी काही कागदपत्रे पोलिसांन कडे दिली. बोईसर पोलिसांनी कारखान्यातच वाहन थांबवावे तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा रसायन साठा दुसऱ्या ठिकाणी नेता येणार नाही अशा सुचना कारखान्याचे व्यवस्थापक नितीन टेकाडे यांना बोईसरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश साळुंखे यांनी दिल्या आहेत. मुळात हा कारखाना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंद केलेला असताना याठिकाणी घातक रसायनाचा साठा का केला हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
◾पालघर दर्पणने वर्षभरापूर्वी याबाबत तक्रार व मनोर पोलिसांन कडून येथील चोरटी केमिकल वाहतूक करणारा ट्रक देखील ताब्यात घेतला होता. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखान्यावर कारवाई करताना येथे उपलब्ध असलेल्या घातक रसायनाची नोंद घेतली होती. हे घातक रसायन मुंबई वेस्ट मँनेजमेंट कडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र कारखानदारांने याकडे दुर्लक्ष करत काही रसायन साठा त्याच ठिकाणी साठवून ठेवला होता. नियमांची पुर्तता केली नसताना देखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजाज हेल्थकेअर कारखान्याला पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले होते.