■ सुनंदा खडपकर
हिंदू पंचांगातील जेष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. सावित्रीने यमराजाशी अतिशय चातुर्याने तत्वचर्चा करून पती सत्यवानाचा प्राण परत आणला. या शास्त्रातील कथेचा आधार घेत पूर्वी सारख्याच आजच्या आधुनिक सावित्री देखील वटपौर्णिमेचा दिवस साजरा करतात. आपल्या पतीला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे यासाठी स्त्रिया वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास ठेवून वडाच्या झाडाची पूजा करतात. त्यासाठी आपल्या आसपासच्या परिसरात असलेल्या वडाच्या झाडाला धागा बांधून ७ फेरे घालतात. व झाडाची पारंपरिक पद्धतीने पूजा करून तिथे उपस्थित असलेल्या स्त्रियांना वाण देतात. आशा पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली जाते.
सध्या स्त्रियांचा समाजात असलेला दर्जा पूर्वीपेक्षा सुधारलेला आहे. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या पदांवर आज स्त्रिया सक्रिय रित्या काम करत आहेत. या सगळ्या धावपळीत व व्यस्त जीवनशैलीमुळे बऱ्याचशा स्त्रिया वडाची फांदी घरी आणून पूजा करतना पहायला मिळते. त्यातच सध्या असलेल्या कोविड १९ या महामारीमुळे गर्दी टाळण्याच्या सकारात्मक हेतूने बऱ्याच स्त्रिया तोडगा म्हणून वडाची फांदी आणून पूजा करण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे बाजारात देखील वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी सहजपणे वडाच्या झाडाच्या फांद्या विकण्यासाठी विक्रेते बसलेले असल्याचे दिसून येतात. मात्र यामुळे सणाचा मूळ हेतू दूर राहतोच उलट वटवृक्षांची छाटणी केल्याने वातावरणातील वायूप्रदूषण देखील वाढते.
■ *यंदा अशी करूया वटपौर्णिमा साजरी.*
यंदा(उद्या) २४ जून रोजी वटपौर्णिमा आहे. वड हे दीर्घायुषी व नाश न होणारे झाड आहे. यामुळे स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करतात. मात्र यंदा वडाच्या झाडाची फांदी तोडून त्याची पूजा करण्या ऐवजी नवीन वडाची झाडे लावून त्याची पूजा केली व त्याचे संगोपन केले तर आपल्या पर्यावरणाच्या दृष्टीने जास्त फायदेशीर ठरेल. आपल्या परिसरात वडाची झाडे असणे हे आरोग्यास देखील हितकारक आहे. वडाच्या झाडामध्ये औषधी गुणधर्म असल्याने शास्त्राप्रमाणेच आयूर्वेदातही या वृक्षाचे फार महत्व आहे.
■ *वटपौर्णिमा साजरी करणे काळाची गरज.*
सध्या कॉन्क्रेटीकरणाच्या जंगलात आता वड व पिंपळ सारख्या झाडांची अतिशय गरज आहे. धार्मिक सणांसाठी मात्र का होईना पण वडाच्या झाडाचे जतन केले जात आहे. त्यामुळे वड यासारखी ऑक्सिजन जास्त देणारी दीर्घायुषी झाडे हयात राहण्यासाठी वटपौर्णिमा साजरी होणे गरजेचे आहे. त्याच बरोबर दिवसभरात कामात स्त्रियांकडून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यास नेहमी दुर्लक्ष होते. त्यामुळे वडाच्या झाडाच्या सानिध्यात राहिल्याने स्त्रियांचे आरोग्य सुधारते.
■ *काय आहे सत्यवान-सावित्रीची कथा*
अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात.