■ आता सर्वच जिल्हे तिसऱ्या स्तरात; राज्य सरकारने केले नियमांमध्ये बदल
पालघर दर्पण, प्रतिनिधी
राज्यामध्ये कोविड-१९ चा पॉजिटीव्ह दर कमी झाल्या नंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्य सरकारने अनलॉकचे नवीन आदेश जारी केले होते. त्यावेळी पाच स्तरांमध्ये निर्बंध शिथिल केले होते. मात्र त्या नंतर काही दिवसातच कोविड-१९ चा पॉजिटीव्ह दर व मृतांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे आता राज्य सरकारने जूनच्या पहिल्या आठवड्यात जारी केलेल्या नियमांमध्ये बदल केले आहेत. यानुसार राज्यातील सर्व जिल्हे व महानगरपालिकांचा समावेश ३ ऱ्या स्तरात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्यातील सर्व जिल्हे आता राज्य सरकारचे पुढील आदेश येई पर्यंत ३ ऱ्या स्तरावरच असणार आहेत. राज्य सरकारने ५ स्तरामध्ये राज्यातील जिल्ह्यांची विभागणी केली होती. मात्र आता ३ऱ्या टप्प्याच्या खाली कोणताही जिल्हा नसणार असुन काही जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे निर्बंध अधिक कडक करण्यासंदर्भात राज्य सरकारने हे पाऊल उचललं आहे. स्तर कमी करायचा असेल तर दोन आठवड्याचा ट्रेंड चेक करावा लागणार आहे. सध्या आरटीपीसीआर व अन्य प्रकारच्या कोविड चाचण्यांचा वापर केला जात असून निर्बंध कमी किंवा वाढवण्यासाठी फक्त आरटीपीसीआर चाचण्यांमधून समोर आलेल्या निष्कर्षांना आधारभूत मानण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे.
■ *काय आहेत नवीन नियम*
३ ऱ्या स्तरात लागू होणारे सर्व नियमांच्या बरोबरच खालील दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे निर्देशन दिले आहेत.
◆ लसीकरणाची वेग वाढवणे व पात्र नागरिकांपैकी ७०% नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर करणे.
◆ कोविड प्रसार रोखण्यासाठी टेस्ट- ट्रॅक-ट्रीट या पद्धतीचा अवलंब करावा.
◆ हवेतून पसरू शकणाऱ्या करोनाच्या विषाणूला टाळण्यासाठी आस्थापनांनी कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि हवेशीर वातावरण ठेवण्याची सक्ती करणे.
◆ सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे अपेक्षित चाचण्या आणि आरटी-पीसीआर चाचण्या मोठ्या प्रमाणात कराव्या.
◆ कोविड-१९ चे हे नियम न पाळणाऱ्यांवर प्रभावीपणे दंडात्मक कारवाई करावी.
◆ गर्दी करणे व गर्दी जमणारे कोणतेही कार्यक्रम व घटना टाळावी.
◆ कंटेनमेंट झोन तयार करताना काळजीपूर्वक आढावा घ्या. जेणेकरून ज्या भागात कोविड-१९ च प्रादुर्भाव आहे. अशाच ठिकाणी निर्बंध लावता येतील.