◾मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; 180 पोती तांदळासह ट्रक जप्त
पालघर दर्पण: वार्ताहर
मनोर: पुरवठा विभागाकडून मंगळवारी 22 जून रोजी रात्री मनोरमधील एका गोदामावर कारवाई करण्यात आली आहे. मनोर गावच्या पाटील पाडा येथील कांडी कंपनी जवळच्या एका गोदामावर हा छापा टाकण्यात आला होता.यावेळी गोदामासामोर उभ्या असलेल्या ट्रक मधून तीन लाख पस्तीस हजार रुपये किंमतीचा नऊ टन तांदूळ जप्त करण्यात आला आहे. तांदूळा आणि ट्रक जप्त करण्यात आला आहे. चालकाविरोधात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोर ग्रामपंचायत हद्दीतील पाटील पाड्यालगतच्या कांडी कंपनी जवळच्या गोदामात रेशनिंगचा तांदूळ आणि गव्हाची साठवून केल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना जागरूक पत्रकारांकडून मिळाली होती.त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी गोदामावर छापा टाकला होता.यावेळी गोदामा समोर उभ्या असलेल्या ट्रक मध्ये 180 पोती तांदूळ आढळून आला. तांदळाच्या साठ्याबाबत ट्रक चालक कागदपत्रे सादर करू शकला नाही.त्यामुळे तांदूळाच्या पोत्यांसह ट्रक जप्त करण्यात आला आहे.बाजारभावानुसार तांदळाच्या साठ्याची किंमत 3 लाख पस्तीस हजार रुपये असल्याची माहिती पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
याप्रकरणी पुरवठा निरीक्षक जयेश माळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मनोर पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू सेवा अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
■ मंगळवारी रात्री पुरवठा विभागाच्या कारवाई दरम्यान गोदामा समोर उभ्या ट्रक वर कारवाई करण्यात आली.यावेळी गोदामातील साठा न मोजता गोदाम चालकाला अभय देण्यात आल्याची चर्चा जोर धरत आहे.हे गोदाम भाडे तत्वावर घेण्यात आले आहे.रेशनिंगच्या गव्हाचा काळाबाजार करताना श्रमजीवी संघटनेच्या तक्रारीनुसार ढेकाळे गावात कारवाई करण्यात आली होती.यावेळी गोदाम चालकाच्या टेम्पोमध्ये 60 पोती रेशनिंगचा गहू आढळून आला होता.याप्रकरणी 25 जून 2020 रोजी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.गोदाम मालक मनोर परिसरातील रेशनिंग दुकादारांकडून काळ्या बाजारातील गहू आणि तांदूळ बेकायदेशीररित्या खरेदी करून विक्री करण्याचा व्यवसाय असल्याची माहिती समोर येत आहे.