रस्ता दुरूस्तीचे मात्र काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे
पालघर दर्पण: सचिन भोईर
विक्रमगड: वाडा – भिवंडी महामार्गाची मोठया प्रमाणात वाताहत झाली असून या रस्त्या संदर्भात अनेक वेळा निवेदने, उपोषणे झाली आहेत. मात्र आजही हा रस्ता ठेकेदार आणि अधिकारी यांच्या भ्रष्टाचाराच्या फेऱ्यात अडकला असून या रस्त्यावर दर वर्षी करोडो रुपये खर्च करूनही या रस्त्याची दुरवस्था कायमच आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे- पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी काल शहर व तालुका कार्यालयास भेट दिली होती व त्यानंतर हस्ते वाडा शाखा उद्घाटन सोहळा व तसेच पाणी पुरवठा योजनेअंतर्गत हारोसाळे गावठाण येथे नारळ वाढवून कामास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर कार्यकर्त्यांना वाडा- भिवंडी रस्त्याबाबत विचारणा करून त्याबाबत आवाज उठविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाडा तालुका अध्यक्ष कांतिकुमार ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वाडा तहसीलदार यांना निवेदन देऊन बांधकाम विभागाने वाडा- भिवंडी महामार्गावरील खड्डे चार दिवसात न भरल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या या इशाऱ्याने बांधकाम विभागाने वाडा-भिवंडी महामार्गावरील खड्डे भरण्याची काम चालू केले. मात्र हे काम एवढे निकृष्ठ करण्यात आले की या कामामुळे अपघातांना निमंत्रण देण्याचे काम पुन्हा बांधकाम विभागाकडून केले गेले.
बांधकाम विभागाकडून वाडा – भिवंडी महामार्गावरील खड्डे चक्क मातीने भरण्याचे काम सुरू असून भर पावसाळ्यात महामार्गावरील खड्डे मातीने भरून किती दिवस नाही तर किती तास टिकणार हाच प्रश्न उपस्थित होत असून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर कोणत्या लोकप्रतिनिधींचा वरदहस्त आहे हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
राज्यात सत्ता शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस यांची आहे तर येथील खासदार भाजपचे आहेत. मागील सहा ते सात वर्षात येथील कोणत्याही लोकप्रतिनिधीने याबाबत आवाज उठविलेला नाही त्यामुळे या कोणत्याही पक्षांकडून आत्ता लोकांच्या अपेक्षा उडालेल्या असून याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय भूमिका घेते याबाबत नागरिकांच्यात उत्सुकता असून त्यांना वाडा- भिवंडी महामार्गाच्या प्रश्नांबाबत आवाज उठविल्यास मोठा पाठिंबासुद्धा मिळू शकतो.