◾पोलिस ठाण्याच्या बाहेरच गावठी कट्टा काढल्याचा आरोप; शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ओस्तवाल भागात दहशत दाखविण्याचा प्रयत्न
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: शहरातील भाजी मार्केट मध्ये एका भाजीपाला विक्री करणाऱ्या इसमांने आपल्या मुलांना सोबत घेवून बोईसर भागात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजीच्या विक्री वरून झालेल्या शुल्क वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून भाजी विक्रेत्यांच्या भावाच्या मुलाने दहशत दाखविण्यासाठी चक्क गावठी कट्टा बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या गुंडगिरी करणाऱ्या भाजी विक्रेत्यावर बोईसर पोलिस देखील दुर्लक्ष करत असून अनेक गुन्हे दाखल असलेल्यांवर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नाही.
बोईसर भाजी मार्केट मध्ये शुक्रवारी 2 जुलै रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास 300 रूपयाच्या उधारी वरून येथील शंभू भाजीवाल्याच्या मुलांनी वाद घातला. याच वेळी शंभूच्या मुलांनी समोरच्या इसमाला बेदम मारहाण देखील केली. त्यानंतर सायंकाळी उशिरा संजय नगर भागात शंभू भाजी वाल्यांच्या मुलांनी सकाळी मारहाण केलेल्या इसमाला पुन्हा राग दाखविण्याच्या उद्देशाने याठिकाणी बाचाबाची झाली. याच वेळी दोन्ही गटामध्ये तुफान हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. याच वेळी शंभू व त्यांच्या मुलांनी बोईसर पोलिसांना याठिकाणी बोलवून घेतले यावेळी सुरू असलेल्या वादात शंभूच्या मुलांनी चक्क पोलिसांना देखील धक्काबुक्की केल्याची माहिती याठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांन कडून नाव न छापण्याच्या अटीवर पालघर दर्पणला दिली आहे. बोईसर पोलिसांनी भाजी वाला शंभूच्या दोन मुलांना ताब्यात घेवून बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा नेले होते.
बोईसर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुंडगिरी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले असतानाच पोलिस ठाण्याच्या गेट बाहेर दहशत माजविण्याचा प्रकार सुरू होता. यावेळी याठिकाणी समोरील गटातील आलेल्या साजीद व दिक्षीत नावाच्या मुलांना भाजीवाला शंभूच्या भावाचा मुलगा सन्नी गुप्ता याने आपल्या सफेद वँगेनार गाडीतून गावठी कट्टा बाहेर काढून धमकवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती खात्रीशीर सुत्रांकडून समोर आली आहे. याच वेळी सन्नी गुप्ता च्या सोबत असलेल्या इसमांने हा कट्टा हिसकावून पुन्हा गाडीत ठेवला. याबाबत बोईसरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश साळुंखे यांना विचारणा केली असता याबाबत चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे यावेळी शंभू भाजीवाला आपल्या सोबत 25 ते 30 मुलांना एकत्र करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना देखील बोईसर पोलिसांनी आपले कर्तव्य बजावण्यात कसून केल्याचा आरोप केला जात आहे.
◾शुक्रवारी रात्री 12 वाजता बोईसरच्या ओस्तवाल भागात दहशत
बोईसरचे वातावरण भंग करणाऱ्या शंभू व त्यांच्या गावगुंडांना बोईसर पोलिसांनी मोकळीक दिल्यानंतर त्यांनी ओस्तवाल भागात येवून हैदोस घातला होता. 15 ते 20 बाईक व चार ते पाच कार घेवून संपूर्ण ओस्तवाल व बोईसर परिसरात फेरफटका मारले जात होते. साधारण रात्री 12:30 वाजता देखील ओस्तवाल येथील वर्ड वाईन परिसरात काही लोकांनी गर्दी केली होती. यातच दहशत माजवणारा भाजीवाला शंभू आपल्या दुचाकीवरून देखील याभागातून सतत फिरत असल्याचे देखील याठिकाणी असलेल्या सिसीटिव्ही मध्ये दिसून येवू शकते.
◾ सन्नी गुप्ता या गुंडगिरी करणाऱ्या इसमांचे ओस्तवाल येथील अनंत अपार्टमेंट येथे भाजीचे दुकान असल्याने त्याने देखील याभागात मोठ्या प्रमाणात गर्दी इमारत परिसरात केली होती. साधारण रात्री 1:30 वाजेपर्यंत हा सर्व प्रकार असाच सुरू होता. याबाबत माहिती मिळताच पालघर दर्पणने बोईसर पोलिसांना वारंवार संपर्क साधून देखील कोणीही प्रतिसाद दिला नाही. परिस्थिती अधिकच बिघडू नये यासाठी सावधगिरी बाळगत याबाबत संपूर्ण माहिती पालघर कंट्रोल रूमला रात्री उशिरा देण्यात आली. मात्र दुसरा दिवस उलटून देखील बोईसर मध्ये लागु असलेल्या संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांन विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.