◾ निविदा होण्यापूर्वी सुरू केलेल्या नियमबाह्य कामाकडे सहा महिन्यापासून ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: पालघर तालुक्यातील नियमबाह्य काम करण्यासाठी अग्रेसर असलेल्या सरावली ग्रामपंचायतीचा आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे. येथील सिध्दार्थ नगर भागात गटाराचे बांधकाम निविदा होण्यापूर्वीच सुरू केल्याचे समोर आले असून सहा महिने उलटून देखील खोदकाम केलेल्या ठिकाणी गटार बांधकाम केले नसल्याने याचा त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे. यातच या कामाची नियमबाह्य निविदा महिनाभरापुर्वी करण्यात आल्याचे समोर आले आहे.
सरावली ग्रामपंचायत अवधनगर, भैयापाडा, सिद्धार्थ नगर अशा सरकारी जागेवर उभ्या असलेल्या अनधिकृत वसाहतींना राजकीय दबावामुळे सुविधा पुरवत असल्याचे याअगोदर देखील उघड झाले होते. असाच प्रकार पुन्हा समोर आला असून ग्रामपंचायत हद्दीतील सिद्धार्थ नगर येथे पावसाळी पाण्याचा निचरा होण्याचे कारण पुढे करत ग्रामपंचायतीने याठिकाणी ठेकेदारा मार्फत गटाराचे खोदकाम सहा महिन्यापूर्वी सुरू केले. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची निविदा प्रक्रिया यावेळी करण्यात आलेली नव्हती. सहा महिन्यापासून राहत्या घरासमोर खोदकाम करून ठेवल्याने रहिवाशांना देखील त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा ग्रामपंचायत कडे तक्रारी करून देखील येथील सदस्य व ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे.
पावसाळा सुरू झाल्याने अर्धवट खोदून ठेवलेल्या गटारामुळे याठिकाणी पाणी साचले जात असून खड्ड्यात पडून लहान मुलांना इजा देखील होत आहे. पंचायत समिती बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील अशा बेकायदेशीर कामासाठी व निविदा प्रक्रिया होण्यापूर्वी सुरू केलेल्या कामाचे अंदाजपत्रक दिले कसे हा सवाल उपस्थित होत आहे. सिध्दार्थ नगर याठिकाणी सुरू केलेले काम साधारण 4 लाखाचे असल्याचे ग्रामपंचायत कडून सांगण्यात येत आहे. निविदा प्रक्रिया होण्यापूर्वी सुरू झालेले काम व सहा महिन्यापासून खोळंबुन ठेवलेल्या कामाला जबाबदार असेला ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून नियमबाह्य काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी जोरधरू लागली आहे.
◾ काम सहा महिन्यापूर्वी याठिकाणी पाणी साचू नये खोदकाम केले होते. गटाराच्या कामाबाबत महिनाभरापुर्वी निविदा करण्यात आली आहे. कामाबाबत ठेकेदाराला सुचना देण्यात आल्या असून बांधकाम विभागाला देखील याबाबत कळविले आहे.
— सुभाष किणी, ग्रामविकास अधिकारी सरावली