अलिकडेच सोशल मिडीयावर एक खूपच कौतुकास्पद बाब वाचनात आली ती म्हणजे केरळ राज्यात शाळेतील विद्यार्थ्यांना भरपूर पाणी पिता यावे याहेतुने दिवसातून तीन वेळा प्रत्येकी दोन मिनीटांची वॉटरबेल असते. खरंतर गोष्ट अगदी साधी आहे पण ती आचरणात आणल्याने उद्याचे जबाबदार, सुजाण नागरिक ….असं मी म्हणणार नाही … तर उद्याचे सुदृढ, सशक्त, निरोगी नागरिक घडविण्यासाठी ही बाब नक्कीच उपयोगी ठरेल.
अलीकडेच आमच्या परिचयातील एका व्यक्तीला त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्याचे डॉक्टरांकडून समजले व सतत डायलिसिस आणि सततचे उपचार यांना कंटाळलेल्या त्या व्यक्तीची जीवनज्योत अखेर मालवली. आज अनेक लोक या समस्येला सामोरे जाताना आपण पाहतो पण अशा रुग्णांना मानसिक आणि झालंच तर आर्थिक मदत करण्यापलिकडे आपण काहीच करू शकत नाही कारण वेळ कध्धीच निघून गेलेली असते. अशा अवस्थेतील हे रूग्ण आत्ताच्या घडीला असतात तसेच आपल्या आजूबाजूला यापूर्वी देखील फिरत असतीलच की ! त्यावेळी त्यांना सांगावयाच्या चार गोष्टी आत्ता सांगून त्याचा काही फायदा होणार नसला तरी आपल्या स्वतःसह इतरांना मात्र आपण नक्कीच मूतखडा, किडनी फेल, इ. विकारांपासून वाचवू शकतो.
आजकाल बदलती जीवनशैली तर या विकाराला कारणीभूत नाही ना? हे अभ्यासणे आवश्यक ठरेल. नोकरीच्या ठिकाणी सतत पाणी प्यायल्याने वारंवार लघवीला जावे लागते या लज्जेपोटी किंबहुना या कुचंबनापर विचारापोटी अनेक लोक व विशेषतः स्त्रिया या विकाराला बळी पडतात. त्यातही बऱ्याचदा कामाच्या ठिकाणी असणारी (अ) स्वच्छतागृहे नियमितपणे स्वच्छ केली जातात की नाही यावरूनही पाणी भरपूर पिणे व सतत लघवीला जावे किंवा नाही हे ठरवले जाते.
कित्येक पुरुष घरातून बाहेर पडताना केवळ हात हलवित जातात. एकतर पाण्याची बाटली सांभाळायचा कंटाळा किंवा मग नुसत्या पाण्याच्या बाटलीसाठी बॅग सांभाळायचे श्रम नको या मानसिकतेमुळेच आजकाल हा आपली किडनी हळूहळू चोरून नेणारा विकार बळावत चाललेला आहे. बऱ्याचदा कामाच्या ठिकाणी असलेली वातानुकूलित व्यवस्था ही देखील शरीराला पाणी कमी पुरविण्याचे काम करते. कारण हा एसी नावाचा आपला जिवलग मित्र आपल्याला जास्त तहानच लागू देत नाही. शेतात शेतकऱ्याने पिकाला पाणी द्यायचं नाही असं ठरवलं तर शेती फुलणारच नाही, अगदी तसंच शरीराचा मळा फुलवून, टवटवीत ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे हाच एक पर्याय आहे.
कित्येकदा भरपुर पाणी पिणे, न पिणे हे व्यवसायावर सुद्धा ठरत असते. तासन् तास संगणकावर काम करणाऱ्या मंडळींना कधीकधी पाणी पिण्याचे भानही राहत नाही. विशिष्ट पेहराव करून आपली कला सादर करणाऱ्या कलाकारांना, लघुशंकेमुळे आपल्या पेहरावाच्या बांधणीत व्यत्यय नको म्हणून इच्छा असूनही पाणी पिणे टाळावे लागते. इतकंच कशाला, माझ्या अत्यंत जवळच्या एका स्नेह्यांना केवळ आणि केवळ त्यांच्या व्यवसायामुळेच आज डायलिसिससारख्या वेदनादायक राक्षसाला कवटाळून बसावे लागले आहे- ड्रायव्हिंग प्रोफेशनमध्ये असताना, प्रवासादरम्यान वारंवार मूत्रविसर्जन करायला नको म्हणून कमी पाणी प्यायल्याने आज त्यांना डायलिसिस सारखा वेदनादायक उपचार घेताना सुद्धा दिवसाला केवळ अर्धा लीटर पेय घ्यावे लागते. हवं ते खाता व पिताही येत नाही.
ललिता नावाच्या माझ्या एका मैत्रिणीला तिचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करताना दररोज लोकलने तीन-साडेतीन तासांचा मोठ्ठा प्रवास करावा लागायचा. मग आपसूकच पाणी कमी प्यायले जात असे. परिणामी गेल्या महिन्यात पाठीतून पोटाकडे येणाऱ्या जीवघेण्या वेदनांवर डॉक्टरांनी ‘किडनी स्टोन’चा शिक्का मारला आणि आज भरपूर पाणी पीत असलेल्या ललिताचा चेहरा पूर्वीपेक्षा अधिक टवटवीत दिसू लागला आहे. कित्येक ठिकाणी तर कामाच्या ठिकाणापासून ते स्वच्छतागृहाचे अंतर जास्त असल्याने संबंधित कर्मचारी, जास्त पाणी पिणे टाळतात. मात्र याचा परिणाम आपल्या शरीरावर असा एका रात्रीत दिसून येत नसतो तर अगदी सावकाशपणे ‘मूतखडा’ नावाच्या नको असलेल्या पाहुण्याचे आगमन होते आणि मग सुरू होतो पुढील जीवघेणा प्रवास हे सारं टाळण्यासाठी चला तर आजपासून संकल्प करूयात- भरपूर पाणी पिऊन चिरकाल निरोगी राहण्याचा.
प्रतिभा क्षीरसागर-कदम, (महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त)