◾ मान हद्दीत रात्री घराचे दरवाजे वाजविणाऱ्या महिलेला गावकऱ्यांनी दिले होते बोईसर पोलिसांच्या ताब्यात
महिलेला पोलिसांनी चौकशी न करताच सोडून दिल्याचा घडला प्रकार
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: पुर्वेकडील मान ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी पहाटे एक धक्कादायक प्रकार घडला असून एका महिलेने गावातील काही लोकांचे दरवाजे वाजवले होते. मदत मिळावी यासाठी जोरजोरात ओरडून एक महिला दरवाजा ठोकत होती. मात्र काही वेळाने गावकऱ्यांनी एकमेकांना संपर्क साधल्यावर लोक जमा झाल्यानंतर या महिने याठिकाणाहुन पळ काढला. विशेष म्हणजे या संशयित महिलेला गावकऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर देखील बेजबाबदार पणे बोईसर पोलिसांनी या महिलेला पहाटे तिन वाजता सोडून दिल्याचा प्रकार घडला आहे.
बोईसर पुर्वेकडील असलेल्या मान ग्रामपंचायत हद्दीतील भंडार आळी भागात शनिवारी रात्री 1 वाजताच्या सुमारास एका महिलेने याभागातील दोन लोकांचे दरवाजे ठोठावले होते. मला मदत करा माझ्या मागे गुंड आहेत असा आवाज देत या संशयित महिलेने गावातील श्रीप्रकाश चुरी यांचा दरवाजा प्रथम ठोठावला रात्रीच्या वेळी दरवाजा ठोकल्याने घरातील लोक देखील थोडी सावध झाली. त्यानंतर याभागातील हर्षद राऊत यांचा देखील दरवाजा ठोठावल्यानंतर एकमेकांना गावकऱ्यांनी फोन करून सर्व घराबाहेर पडले. मात्र यादरम्यान या महिलेने याभागातून पळ काढत ओस्तवाल वंडर सिटी भागात जात असताना त्या महिलेला गावकऱ्यांनी अडवले. गावकऱ्यांनी पोलिसांनी हा प्रकार सांगितल्यावर एक तासाने बोईसर पोलिस याठिकाणी पोचले होते.
पोलिसांनी महिलेला विचारणा केली असता मला बंदिस्त करून याभागात विरार हून आणले असल्याचे तिने गावकऱ्यांन समोर पोलिसांना सांगितले. या महिलेच्या हातामध्ये मोबाईल फोन देखील असल्याचे दिसून आले होते. महिलेला बोईसर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी कैलास पाटील व त्यांच्या सहकार्यांनी ताब्यात घेवून बेटेगाव चौकीवर पहाटे तिनच्या सुमारास आणले होते. मात्र कोणत्याही प्रकारची सखोल चौकशी न करताच बोईसर पोलिसांनी महिलेला पहाटेच्या वेळी बोईसर रेल्वे स्थानकात सोडून दिले. विशेष म्हणजे या घटनेची स्टेशन डायरीमध्ये देखील नोंद घेण्यात आलेली नाही. महिलेने पोलिसांना बनावट नाव सांगितले असल्याचे समोर आले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
मान भागात गेलेले पोलिस कर्मचारी कैलास पाटील यांना याबाबत अधिक माहिती विचारली असता त्यांनी महिला असल्याने रात्री सोडले असल्याचे सांगितले. तसेच या महिलेकडे मोबाईल देखील नसल्याची माहिती पोलिसांनी दिली असली तरीही गावकऱ्यांनी महिले कडे मोबाईल असल्याचे सांगितले असल्याने या प्रकाराचे खरे गुपित उलघडा नेमकी कधी होईल याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले.