◾ तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सत्तर बंगला येथून केली जात होती रासायनिक घनकचऱ्यांची वाहतूक; स्थानिक गुन्हे शाखा व बोईसर पोलिसांनी केली कारवाई
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सत्तर बंगला येथून घातक रासायनिक घनकचरा विल्हेवाट लावण्यासाठी नेत असताना स्थानिकांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. मंगळवारी रात्री उशिरा म्हणजेच बुधवारी पहाटे स्थानिक गुन्हे शाखा व बोईसर पोलिसांनी ही कारवाई केली असून रासायनिक घनकचरा व तेथे काम करणाऱ्या कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून हा रासायनिक घनकचरा अशाच प्रकारे विल्हेवाट लावली जात असल्याचे या घटनेनंतर उघडकीस आले आहे.
औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यावर कोणत्याही प्रकारचे नावाचा उल्लेख नसलेल्या प्लाँट नंबर डब्ल्यू 187 या बेकायदेशीर कामकाज चालणाऱ्या कारखान्यातून मंगळवारी रात्री उशिरा रासायनिक घनकचरा हातगाडी वर टाकून घेवून जात असल्याचे पर्यावरण दक्षता मंचाचे मनिष संखे यांच्या निदर्शनास आले होते. त्यांनी लागलीच याबाबत माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत व बोईसर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश साळुंखे यांना दिली. मात्र तासभर याठिकाणी कोणीही आले नाही. त्यामुळे त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिल्यानंतर काही वेळातच त्यांनी आपल्या कर्मचाराला त्याठिकाणी तातडीने पाठवले. स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटच्या कर्मचाऱ्यांने घातक रासायनिक साठा विल्हेवाट लावण्यासाठी घेवून जाणाऱ्यांना सखोल चौकशी केली असता याठिकाणी असलेल्या झुडपात नेहमी घातक रासायनिक कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असल्याचे उघड झाले. त्यानंतर तासाभराने आलेल्या बोईसर पोलिसांनी रासायनिक घनकचरा व येथील कामगारांना ताब्यात घेवून बोईसर पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
रासायनिक घातक घनकचऱ्यांची विल्हेवाट लावण्यासाठी येथील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा समावेश आहे. याठिकाणी रासायनिक घनकचरा वाहतूक सुरू असताना स्थानिकांनी ज्यावेळी जाब विचारला त्यावेळी सुरूवातीला येथील माफियांनी आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे उपस्थितांनी सांगितले आहे. याठिकाणी असलेल्या कारखान्यात चोरीचे केमिकल व रासायनिक द्रव्याची तस्करी केली जाते. विशेष म्हणजे याबाबत सर्व पोलिस यंत्रणेला देखील कल्पना आहे. याठिकाणी ज्यावेळी रासायनिक घनकचरा अडविण्यात आला तेव्हा येथील कामगारांने राजा नावाच्या व्यक्तीचे नाव घेत राजासे बात करो असे सांगितले. याठिकाणी असलेला केमिकल माफिया राजा नावाच्या व्यक्तीला याठिकाणी कामकाज पाहण्यासाठी नेमणूक केल्याचे उघड झाले असून याभागातील केमिकल माफियांवर व त्यांच्या टोळ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांन कडून केली जात आहे. यामुळे आता स्थानिक गुन्हे शाखा व बोईसर पोलिस नेमकी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
◾ कोण आहे हा राजा..
बोईसर पोलिसांनी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश साळुंखे यांचा खबरी म्हणून या राजा नावाच्या इसमांने काम केले असून साळुंखे यांना गंडा घालून हा काही दिवस झाले फरार आहे. बोईसर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेला या बनावट व माफियां सोबत संबंध असलेल्या माणसा बाबत माहिती असताना देखील कोणत्याही प्रकारची कारवाई आजवर झालेली नाही.
साखरे डँम येथे टँकरने सोडण्यात आलेल्या घातक रसायन प्रकरणातील तडजोड करणारा राजा हा मुख्य इसम आहे. टाळेबंदी बोईसर मार्केट येथे भाजीवाला विक्रेते यांच्या कडून पोलिसांच्या नावाने साधारण तीन लाखाची वसूली केली होती. यावेळी बोईसर पोलिसांनी त्यांच्या घरी टाकलेल्या धाडीत त्याच्या घरी बनावट पिस्तूल सापडली होती. त्यावेळी देखील त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही.
औद्योगिक क्षेत्रात रात्रभर फिरून केमिकल वाहने अडवून त्याची तडजोड करण्याचा व केमिकलची विल्हेवाट लावणाऱ्या माफियांना वाट मोकळी करून देण्याचे हा काम करतो. यातच अनेकदा रात्रीच्या वेळी बनावट पिस्तूल दाखवून देखील वसुली केल्याची खात्रीशीर माहिती अनेकदा समोर आहे. यामुळे या राजाची बोईसर पोलिस नेमकी काय विल्हेवाट लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.