◾शरद पवारांचा एकेरी उल्लेख करत केला राडा
जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांने मारला कायदा फाट्यावर

पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
पालघर: कामापेक्षा प्रसिध्दीच्या मागे असलेल्या विक्रमगड विधानसभेचे राष्ट्रवादी आमदार पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून हवेत असलेले दिसून आले. यावेळी तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करून जिल्हापरिषद सदस्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातच हा सर्व तमाशा चक्क पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झाला असताना देखील कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. घटनेचा सर्वच स्तरातून निषेध होत असून आमदारांच्या बेजबाबदार वागण्यामुळे राष्ट्रवादीची लक्तरे निघाली आहेत.

येत्या मंगळवारी 20 जुलै रोजी पालघर जिल्हा परिषदेच्य अध्यक्षपदाची निवडणूक असल्याने त्या अगोदरच राष्ट्रवादी व निलेश सांबरे गटाचे एकूण सहा सदस्य व काँग्रेसचा एक सदस्य अशांनी निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखाली वेगळा गट स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची अनेकदा भेट मागीतली होती. मात्र वेळोवेळी जिल्हाधिकारी यांनी वेळ देण्यासाठी टाळाटाळ करत 14 जुलै रोजी सकाळची वेळ दिली. परंतु राष्ट्रवादी व शिवसेनेच्या मंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांच्यावर दबाव टाकल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी गट स्थापन करण्यासाठी आलेल्या सांबरे गटाच्या सात सदस्यांना बाहेरच ताटकळत ठेवले होते. यावेळी सर्व सदस्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत जिल्हाधिकारी दालनातच ठिय्या आंदोलन सुरू केले. याची माहिती मिळताच याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील भुसारा व जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी पोहोचले व गट स्थापन करण्यासाठी आलेल्या शिवा सांबरे व इतर सदस्यांना धमकविण्याचा प्रयत्न करत धक्काबुक्की देखील केली. जिल्हाधिकारी कार्यालयात हा प्रकार घडत असताना पोलिसांनी देखील बघ्यांची भुमिका घेतली.

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात रागाने ओरडत असलेल्या आमदार भुसारा यांना समजविण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे डॉ. सुहास संखे यांनी केला. मात्र भुसारांनी कोणाचेही ऐकून न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करून “शरद पवारला सांगा जा, इथे काय आय घालता तुम्ही” अशा अर्वाच्च भाषेत शिविगाळ करुन जिल्हा परिषद सदस्य शिवा सांबरे यांना धक्काबुक्की केल्याचे एका व्हिडीओ मध्ये दिसून आले आहे. यातच याठिकाणी एका महिला सदस्यांना देखील हाताला धरून ओढून नेण्याचा प्रयत्न आमदारांनी केला असून आमदारांनी आपली पायरी ओलांडली असल्याचे दिसून आले.
◾ घटनेचे चित्रीकरण करत असलेल्या टिव्ही चँनल च्या रिपोर्टरचा हिसकावला मोबाईल

आमदार सुनील भुसारा जिल्हाधिकारी दालनात धुडगूस घालत असताना याठिकाणी टिव्ही 9 चे पत्रकार हुसेन खान आपल्या मोबाईलवर विडीओ चित्रीकरण करत होते. याच वेळी याठिकाणी उपस्थित असलेल्या आमदारांचे समर्थक व कार्यकर्ता हनिफ शेख याने हुसेन यांना चित्रिकरण करण्यासाठी मज्जाव करत त्यांचा फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. हनीफ आमदाराच्या सोबतीला फिरून गुंडगिरी करत असल्याचे यावेळी दिसून आले.

◾ आमदार सुनील भुसारा यांनी याअगोदर खाजगी वाहनांवर सायरन लावून बनावट पोलिस वाहन आपल्या ताफ्यात ठेवले होते. याबाबत पालघर दर्पणने विषय उचलून धरल्यानंतर खाजगी वाहनावर असलेला आवाजाचा भोंगा काढण्यात आला होता.

◾ यापूर्वी त्यांनी आमदार निधीतून खरेदी करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेवर स्वतः चे फोटो छापून चमकूगिरी देखील केली होती. ह्या चमकूगिरीला पालघर जिल्हाधिकारी यांनी आवर न घालता डोळेझाक करण्याची भूमिका घेतली.