◾ शनिवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
पालघर: जिल्ह्यात शनिवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर, वसई परिसरात पावसाचा मोठा फटका बसला ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूकही विस्कळीत झाली होती. त्यामुळे काही काळ पश्चिम रेल्वे सेवा कोलमडली होती. नैसर्गिक नाले तुडुंब वाहत असल्याने अनेक भागातील वाहतूक बंद झाली होती.
पावसाने अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी रात्री जोरदार पावसाने पालघरच्या किनारपट्टी भागासह ग्रामीण भागातील काही भागांना झोडपले. या पावसाचा मोठा फटका पालघर व डहाणू तालुक्याला बसला पालघर व डहाणू तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले होते. त्यामुळे ठिक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली. पालघर तालुक्यातील कोळगाव येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या पालघर जिल्हा मुख्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पहावयास मिळाले. येथील पालघर बोईसर रस्ता पूर्णपणे जलमय झाला होता. आजूबाजूच्या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरून जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले.
पालघर शहरातील वीरेंद्र नगर परिसरात नागरिकांच्या घरात चार फुटापर्यंत पाणी होते याचबरोबरीने सफाळे नंदाळे या भागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरले होते.नागरिक टेरेसवर बसून होते.नागरिक व पोलिसांच्या मदतीने ८० नागरिकांना सुखरूप स्थळी हलवले.बोईसर पूर्व पट्ट्यातील बेटेगाव चौकी नजीकचा पूर्ण रस्ता पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक काही काळ बंद झाली होती.याचबरोबरीने नागझरी पुल देखील पाण्याखाली गेल्याने या पुलाचा संपर्क सुटला होता. गुंदले येथेही मोठ्या प्रमाणात पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने यांच्या जीवनावश्यक वस्तूचे मोठे नुकसान झाल्याचे दिसले मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घराचे नुकसान झाले असले तरी कुठेही जीवितहानी झाल्याची घटना घडलेली नाही.
डहानु तालुक्यातील वरुड परिसरामध्ये रस्ता पूर्णपणे जलमय झाल्याने तेथे ही वाहतूक काही काळ खोळंबली होती याचबरोबरीने शहरातील इराणी रोड पाण्याखाली गेला होता बस डेपो मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरून बस डेपो ला तलावाचे स्वरूप आले होते. डहाणू तालुक्यात अतिवृष्टी ने लाखो रुपयांचे नुकसान रात्री पासून सुरु झालेल्या पावसाने डहाणू, कोसबाड, बोर्डी, घोलवड भागात पाणीच पाणी झाले. डहाणू बाजारपेठेत पाणी शिरून दुकानदार, व्यापारी, बँका, यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पश्चिम रेल्वेच्या पालघर, बोईसर, तसेच विरार आदी ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पहाटे पासून पाणी चंढल्याने पहाटे तीन वाजल्या पासून सकाळी दहा वाजेपर्यंत रेल्वे ट्रेन सेवा बंद पडली होती, मुंबईला नोकरी निमित्ताने जाणारया चाकरमानी तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी पहिल्या पाळीच्या कामासाठी जाऊ शकले नाहीत.पालघर मधिल माहीम रस्त्यावरील पानेरी नदीच्या पुलावरून तीन ते चार फूट पाणी चढल्याने या ठिकाणाहून माहीम, केळवे, मधुकर नगर, दांडा, खटळी, भादवे, उसरणी, एडवणं, कोरे, दातीवरे या भागातील वाहतूक रात्री पडून बंद पडली होती ती सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पाणी ओसरल्यानंतर सुरू झाली.
पालघर शहरातील गोठणपूर, लोकमान्य नगर, मोहपाडा, डुंगी पाडा, घोलविरा, मणि नगर, कमला पार्क, तसेच टेम्भोडे येथील फुले नगर, आदी भगत रात्री पासून घरामध्ये पाणी शिरले होते, तर वसई तालुक्यातील कण्हेर येथे रात्री पावसाचे पाणी तुंबण्याचा प्रकार झाल्याने येथील ७० ते ८० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले होते.मात्र सकाळी पाणी ओसरल्यावर हे सर्व जण सुखरूप आपल्या घरी पोहोचल्याचे तसेच येथे काही घरामध्ये पाणी शिरल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातुन सांगण्यात आले.
सफाळे बाजारा पेठेत पाणी शिरल्याने किराणा, इलेक्ट्रॉनिक, व कपड्याच्या दुकानात पण8 शिरल्याने मोठे नुकसान झाले तर सफाळ्याच्या काही भागात ७० ते ८० घरामध्ये पाणी शिरल्याने या कुटुंबांना पहाटे साडेचार वाजता पोलीस, ग्राम पंचायत व सर्प मित्र संघटने सुरक्षितस्थळी हलविले सकाळी या सर्वांना पुन्हा आपल्या घर आणण्यात आले. सफाळे जवळील मांडा या भागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ता पुराच्या पाण्यात वाहून गेला.
◾जिल्ह्यात सरासरी ११६.३९ मिमी, पावसाची नोंद झाली असून सर्वात जास्त पाऊस पालघर जिल्ह्यात २१०.० मी मी पडला असून विक्रमगड तालुक्यात सर्वात कमी ३१.० मी मी पाऊस झाला आहे तर वसई तालुक्यात १८१.० मी मी, तलासरी तालुक्यातील १७९.०मी मी, डहाणू तालुक्यात १३३.८२ मी मी, वाडा तालुक्यात १२०.७५ मी मी, मोखाडा तालुक्यात ५०.९५ मी मी व जव्हार तालुक्यात ३३.६७ मिमी, अशी पावसाची नोंद रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतची होती