◾लघु पाटबंधारे विभागाच्या बेजबाबदार अभियंता किशोर प्रल्हाद अवचार यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सलीमठ यांनी केली कारवाई
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
पालघर: वाडा तालुक्यातील शेल्टे बंधारा फुटल्या प्रकरणी लघु पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याला निलंबित करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सलीमठ यांनी ही कारवाई केली आहे. याच बंधाऱ्याच्या दुरूस्ती साठी लाखो रूपयाचा खर्च याच वर्षी केल्याचे उघड झाले असून पालघर मधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. अभियंत्यावर कारवाई केली असली तरी याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी नागरिकांन कडून केली जात आहे.
पालघर जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता किशोर प्रल्हाद अवचार याला पाझर तलावाच्या दुरुस्तीत दुर्लक्ष केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. 21 जुलै रोजी वाडा तालुक्यातील शेल्टे पाझर तलावाचा बंधारा वाहुन गेला होता. या वर्षी स्थानिक शेतकऱ्यांनी या बंधाऱ्याच्या दुरुस्ती साठी पाटबंधारे विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार केला होता. यातच याच वर्षी या बंधाऱ्याची 27 लाख रुपये खर्च करून दुरुस्ती केली होती. मात्र दुरुस्तीचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप नागरिकांन कडून करण्यात आला होता. कागदोपत्री झालेल्या बंधाऱ्याच्या दुरूस्ती मुळेच हा बंधारा वाहुन गेल्याचा आरोप केला जात आहे.
पाझर बंधा-यातील पाण्याचा उपयोग शेल्टे, वावेघर, मुंगुस्ते, गो-हे या चार गावांतील शेकडो शेतकरी उन्हाळ्यात कलिंगड शेती, विविध प्रकारच्या भाजीपाल्याची शेती व फुलशेतीसाठी केला जात होता. मात्र बुधवारी झालेल्या अतिवृष्टीत या बंधाऱ्याचा 60 मीटरहुन अधिक लांब व 15 मीटर खोल मातीचा बांध तुटून वाहुन गेल्याने या बंधाऱ्यातील पाणी सर्व निघून गेले आहे.
स्थानिक आदिवासी शेतकरी या बंधाऱ्यात मासेमारीचा व्यवसाय करीत होते. या पाझर बंधा-याला गतवर्षीच मोठ्या प्रमाणावर गळती लागली होती. त्यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी ही गळती थांबवली होती.