◾घातक रसायनाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या माफियाला मोकळीक
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पत्रावर सोडून दिला रसायन भरलेला बेकायदेशीर ट्रक
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
मनोर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्यातुन बेकायदेशीर पणे घातक रसायन वाहतूक करणाऱ्या ट्रक ला मनोर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र आता बेकायदेशीर असलेला ट्रक कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई न करताच संगनमताने सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केमिकल माफियांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ठाणे प्रादेशिक कार्यालयातुन या ट्रक मधील रसायन मुंबई वेस्ट मँनेजमेंट कडे पाठविण्यासाठी पत्र आणले होते. मात्र परंतु मनोर पोलिसांनी देखील त्याच पत्राला पुढे करत घटनाबाह्य हा ट्रकच सोडून दिला आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातुन रसायनाची विल्हेवाट लावण्यासाठी 15 जुन 2021 रोजी सायंकाळी ट्रक मधून रसायन भरलेले ड्रम घेवून जात असल्याची माहिती पालघर दर्पणला प्राप्त झाली. हेच वाहन बेटेगाव चौकी वरून केमिकल माफियांने नेहमी प्रमाणे पुढे केले. विशेष म्हणजे या ट्रक सोबत कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नव्हती. या घटने मधील अधिक माहिती अशी की, याबाबत तातडीने स्थानिक गुन्हे शाखेला कळविले मात्र ते इतर गुन्ह्याच्या तपासासाठी बाहेर असल्याने बेकायदेशीर ट्रक बाबत मनोर पोलिसांना पालघर दर्पणच्या टिमने माहिती दिली. हा ट्रक साधारणपणे 5:50 वाजता नागझरी येथील पेट्रोल पंपावर देखील उभा होता. याठिकाणी खाजगी वाहनातून आलेले मनोर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अजित कणसे यांनी कारवाई केली नाही. वाहन थोड्या पुढे गेल्यावर कारवाई करू असे अधिकाऱ्यांने सांगितले आणि खुटल येथे असलेल्या धाब्यावर ट्रक थांबल्यानंतर याठिकाणी ट्रक मालक पोलिसांना भेटण्यासाठी आल्यावर कारवाई करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक अजित कणसे यांचा कल दिसून येत नव्हता. हा ट्रक धाब्यावर सायंकाळी 6:37 पासून उभाच होता. याबाबत पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार केल्यानंतर साधारण रात्री 8 वाजता रसायन भरलेला ट्रक मनोर पोलीस ठाण्यात आणण्यात आला.
केमिकल माफिया व ट्रक हे प्रकरण वरिष्ठ पातळीवर गेल्यानंतर पुढील कारवाई बाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित कोळी यांच्या कडे तपास देण्यात आला होता. मात्र संशयास्पद कामकाज करणाऱ्या मनोरच्या पोलिसांनी शेवटी केमिकल लोचा पुर्णच केल्याचे म्हणावे लागेल. मनोर पोलिसांनी ताब्यात घेतलेला ट्रक क्रमांक एम एच 04 इवाय 5517 या ट्रक मध्ये घातक रसायनाने भरलेले 44 ड्रम होते. ड्रम मध्ये असलेले रसायन घातक असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालानुसार स्पष्ट झाले असून हे सर्व रसायन आरती ड्रग्स लिमिटेड या प्रदूषणकारी कारखान्यांचे असल्याचे उघड झाले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जरी तडजोड करून कायद्यातील पळवाटा शोधल्या असल्या तरी पोलिसांनी आपल्या कर्तव्यात कसुर का केली हा सवाल उपस्थित होत आहे.
◾प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उप प्रादेशिक अधिकाऱ्यांकडून आरती ड्रग्स लिमिटेड कारखान्याने घातक रासायनिक घन कचऱ्याच्या वाहतूक करताना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईचा प्रस्ताव प्रादेशिक अधिकाऱ्यांना दिला होता. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उप प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या प्रस्तावा नुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत यांनी आरती ड्रग्स लिमिटेड कारखान्याला फक्त कारणे दाखवा नोटीस देण्याचे नाट्य केले आहे. इतर प्रकरणात करण्यात येणाऱ्या फौजदारी कारवाई बाबत मात्र या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत कायद्यातील पळवाटा शोधण्याचा प्रयत्न केला स्पष्ट होते.
◾वजनदार केमिकल माफियांन साठी विशेष सवलत
घातक रसायनाची बेकायदेशीर वाहतूक प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जातो. या प्रकरणी तर प्रदूषण नियंत्रण मंडळाने एक पत्रक काढून त्यामध्ये ट्रक मध्ये असलेले रसायन मुंबई वेस्ट मँनेजमेंट कडे पाठवण्या बाबत उल्लेख केला होता. मात्र मनोर पोलिस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकाऱ्यांच्या देखरेखीत जप्त केलेल्या ट्रक मधील घातक रसायन अधिकृत ट्रक मध्ये लोड करण्या ऐवजी रसायनाने भरलेला ट्रक कारखाना व्यवस्थापनाच्या ताब्यात देण्यात आला. त्यामुळे मनोर पोलिस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या भुमिका संशयास्पद आहे.