महामार्गालगतच्या खड्ड्यात बस उलटली, कामगार किरकोळ जखमी
पालघर दर्पण: वार्ताहर
पालघर: मुंबई अहमदाबाद महामार्गावर बोट गावच्या हद्दीतील उड्डाणपूलाच्या उतरावर गुरुवारी ५ आँगस्ट रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास भरधाव वेगातील प्रवासी बस चालकाला हृदय विकाराचा धक्का आल्याने प्रवाशी बस महामार्गालगतच्या खड्ड्यात उलटून अपघात झाला आहे. अपघातात बसमधील १८ ते २० प्रवाशी किरकोळ जखमी झाले होते. त्यांना मनोरच्या खाजगी रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले. अपघातग्रस्त बसमध्ये टेन गावच्या हद्दीतील महामार्गालगतच्या कुमार मेटल इंडस्ट्रीज कारखान्यातील कामगार प्रवास करीत होते.
टेन नाका उड्डाणपूला लगतच्या कुमार मेटल इंडस्ट्रीज या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना घेऊन प्रवासी बस एमएच ४८ बीएम ६४८७ गुरुवारी सकाळी महामार्गाच्या गुजरात वाहिनीवरून मस्तान नाक्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना चालकाला हृदयविकाराचा धक्का आल्याने चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. अपघातात बस महामार्गालगतच्या वृद्धाश्रमासमोरील खड्ड्यात जाऊन उलटली होती. अपघातात बस मध्ये प्रवास करणारे कामगार किरकोळ जखमी झाले होते. त्यांना स्थानिकांच्या मदतीने अपघात ग्रस्त बस मधून बाहेर काढल्यानंतर मनोरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी अधिक माहिती घेण्यासाठी कारखाना व्यवस्थापना संपर्क साधला असता माहिती देण्यास नकार दिला.