◾कामगार युनियनच्या वादातून फाडला बाळासाहेबांचा फोटो
सेनेतील वाद आले स्वतःच्या दैवताचे फोटो फाडून चव्हाट्यावर
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
पालघर: कामगार युनियनच्या माध्यमातून आपली आर्थिक ताकद वाढविण्यासाठी शिवसेनेच्या अनेकांनी प्रयत्न सुरू केले असले तरी यातून पक्षांतील वाद चव्हाट्यावर आले आहेत. पालघर मधील एका कंपनीत लावण्यात आलेल्या युनियनचे फलक फाडून बाळासाहेब ठाकरे यांची विटंबना केल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र फेसबुक प्रकरणात वाघाच्या डरकाळ्या मारणारे पालघर मधील नेते आता यावेळी दिसेनासे झाले आहेत. यामधील सत्य कारण म्हणजे सेनेच्या दुसऱ्या गटातील एकाने हा फलक फाडल्याची माहिती समोर आली असून वडराई येथील एकाला फरार करण्यात आले आहे.
पालघर पूर्व वेवूर येथील फ्रेडुन फार्मसिटीकल लिमिटेड कंपनीत युनियन स्थापन करण्या वरून शिवसेना प्रणित दोन संघटनांच्या वादात हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांचा फोटो असलेले बॅनर फाडुन फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. मंगळवारी 3 आँगस्ट रोजी हिंद भारतीय जनरल सेनेचे अध्यक्ष असलेले श्रीपाद(अप्पा)पराडकर,सरचिटणीस घनश्याम नाईक ह्यांच्या युनियनच्या नामफलकाचे उदघाटन जवळ पालघर तालुकाध्यक्ष तथा शिवसेनेचे पदाधिकारी निलम संखे, मुकेश पाटील यांच्या हस्ते झाले. माथाडी कामगार संघटनेतून बाहेर पडलेल्या कामगाराना सोबत घेत कंपनी च्या भिंतीला आपल्या युनियन चे बॅनर लावल्यावर आम्हाला नक्कीच न्याय मिळेल असा विश्वास उपस्थित कामगारांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे याठिकाणी असलेले कामगार याअगोदर शिवसेनेच्याच प्रणित असलेल्या युनियन मध्ये कार्यरत होते. नवीन युनियन स्थापन झाल्यानंतर रात्री हिंद भारतीय जनरल सेनेचे बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडून घाणीत फेकून दिल्याचे वृत्त समाजमाध्यमावर झळकले होते.
हिंद भारतीय जनरल सेनेचे बॅनर फाडताना बाजूला असलेल्या माथाडी कामगार सेना आणि त्याचे सरचिटणीस सुशील चुरी यांचे फलक सुरक्षित असल्याने यामध्ये पक्षातीलच दोन गटा मधील वाद असल्याचे दिसून आले आहे. पालघर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे बोलले जात असले तरी या बालेकिल्ल्यात आपल्याच दैवताचे फोटो हे युनियनच्या आर्थिक लाभापोटी फाडल्याचा निंदनीय प्रकार समोर आल्याने शिवसेनेत नेमके चालले तरी काय असा सवाल नागरिकांन कडून उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी पालघर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. पालघर पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याने पोलीस तपासात या मागच्या मुख्य सुत्रधाराचा बुरखा सर्वांसमोर फाटला जाऊ नये म्हणून बॅनर फाडण्याच्या प्रकरणातील वडराई येथील संशयिताला फरार करण्यात आले आहे.
शिवसेनेतील दोन्ही संघटनां मधील हा आमचा वाद आम्ही आमच्या पातळीवर मिटवून घेऊ असा दबाव पोलिसांन वर टाकला जात असल्याची माहिती समोर आली असून पक्षांची लक्तरे बाहेर काढणारे प्रकरण कोणाच्या अंगलट येते हे पाहणेच औचित्यांचे ठरणार आहे.
◾बालेकिल्ल्यातील वाघ शांत…
राज्यात एखाद्या विरोधकांने शिवसेना विरोधात विषयक काही अपशब्द जरी काढला तरी पालघर मध्ये छाती फुगवून नेते घोषणाबाजी करत त्यांचा ओरडून ओरडून निषेध करताना दिसतात. मात्र शिवसेना मधीलच एका गटाने फलक पाडल्याचा आरोप होत असल्याने आपल्या दैवताचे फोटो पाडून देखील वाघांनी गप्पच राहणे पसंत केले आहे. यामुळे राजकीय नेते सोईनुसार घोषणाबाजी करतात असे या प्रकरणातून दिसून आले आहे.