शुक्रवारी महामार्गावर तीन अपघात; तीन वेगवेगळ्या अपघातात सात प्रवाशी आणि दोन चालक जखमी.
पालघर दर्पण : वार्ताहर
पालघर: मुंबई अहमदाबाद महामार्गावर शुक्रवारी अपघातांची मालिका घडली, तीन वेगवेगळ्या अपघातात सात प्रवाशी आणि दोन चालक जखमी झाले आहेत.अपघात ग्रस्त वाहने हटविण्यास उशीर झाल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.बोट,हालोली आणि दुर्वेस गावच्या हद्दीत हे अपघात झाले होते. गुरुवारी बस चालकाला हृदयविकाराचा धक्का आल्याने अपघात होऊन अठरा कामगार जखमी झाले होते.
महामार्गावरील हालोली गावच्या उड्डाणपूला ब्रिज टेम्पो एमएच ४६ बीएफ ७७४३ शुक्रवारी पहाटे गुजरातच्या दिशेने जात असताना त्यांच्या पुढे चालणाऱ्या अज्ञात वाहनाला ठोकर दिल्याने अपघात झाला होता. अपघातात टेम्पो महामार्गावर आडवा पडला होता. अपघात ग्रस्त टेम्पोचालक इजाज अली मुल्ला (वय.३०) जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दुर्वेस गावच्या हद्दीत गुजरात मार्गिकेवर अवजड ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला होता. या अपघातात कंटेनर रस्त्यावर आडवा पडला होता. हालोली टेम्पो आणि दुर्वेस ला कंटेनर महामार्गावर आडवा पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. क्रेनच्या साहाय्याने अपघात ग्रस्त टेम्पो याआणि कंटेनर रस्त्यावरून हटवल्यानंतर सकाळी सहा वाजताच्या सुमारास वाहतूक पूर्ववत झाली.
■शुक्रवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास महामार्गाच्या गुजरात वाहिनीवर बोट गावच्या हद्दीत भरधाव कारचा टायर फुटून कार दुभाजक ओलांडून गुजरात मार्गिकेवरील टाटा मॅजिकला धडकून अपघात झाला होता. अपघातात सात प्रवाशी जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टुरिस्ट कार एमएच ०२इएच ३९२८ महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जात असताना बोट गावच्या हद्दीत भरधाव वेगातील कारचा टायर फुटल्याने कार दुभाजक ओलांडून गुजरात मार्गिकेवर टाटा मॅजिक गाडीला धडकल्याने अपघात होऊन कार पलटी झाली.अपघातात मॅजिक मधील पाच प्रवासी आणि कार मधील दोन प्रवाशी किरकोळ जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.