पालघर दर्पण : वार्ताहर
विक्रमगड: वाडा तालुक्यातील गारगाव ते शिलोत्तर या मार्गाचे डांबरीकरण येत्या उन्हाळ्यात करण्यात आले असून त्यासाठी करोडो रुपयांचा निधीही खर्च करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी केलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष केल्याने मोऱ्यांचा मोठा भाग पुराच्या पाण्यात पुन्हा वाहून गेल्याने पुन्हा रस्त्याची दुर्दशा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गारगाव ते शिलोत्तर या मार्गावर डांबरीकरण करण्यासाठी जवळपास 2 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. रस्ता बनविला जात असतांना विशेषतः गारगाव गावाजवळ पुन्हा रस्त्याची दुर्दशा होऊ नये यासाठी मोऱ्यांच्या खाली फाउंडेशन तसेच बाजूला संरक्षक भिंती बांधल्या जाव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सतीश मराडे यांनी काम अंदाजपत्रकानुसार व उत्तम सुरू असल्याचा दावा केला होता.
पाहिल्याच पावसात मराडे यांनी केलेला उत्तम मोऱ्यांचा दावा वाहून गेला असून संरक्षक भिंत नसल्याने रस्ताही वाहून जात आहे. मार्गावरील सर्वच मोऱ्या दबल्या असून बाजूने तुटल्याने नादुरुस्त व निकृष्ट झाल्या आहेत. या सर्व मोऱ्यांची कामे पुन्हा ठेकेदाराकडून विनामूल्य करून घ्यावीत किंवा अधिकाऱ्यांच्या पगारातून याची भरपाई करून घ्यावी अशी मागणी येथील ग्रामस्थानी केली आहे. याबाबत शाखा अभियंता सतीश मराडे यांना संपर्क केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.