◾ बेकायदेशीर युरिया वाहतूक करणाऱ्या वाहनाचा मालक फरार
नरेश रोडलाईन चा मालकाला पोलिसांनी दिली मोकळीक?
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
पालघर: बोईसर पोलिसांनी बेकायदेशीर वाहतूक होत असलेला युरियाचा साठा ताब्यात घेतला असून युरिया प्रकरण आजुनही गुलदस्त्यात आहे. युरियाचा पकडलेल्या ट्रक बाबत कोणतीही माहिती देताना पोलिसांनी सावध भुमिका घेतली आहे. मात्र वाहन ताब्यात घेताना कोणत्याही प्रकारची बिले किंवा चलन सोबत नसताना देखील बोईसर पोलिस कोणतीही ठोस कारवाई केली नाही. युरिया खताचे नमुने कृषी विभागाच्या ताब्यात देवून ते तपासणी साठी पाठविण्यात आले असून तपसणी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करू अशी भुमिका बोईसर पोलिसांनी घेतली असली तरी टेम्पो मालक गुजरात मध्ये फरार झाला आहे.
तारापूर औद्योगिक वसाहती मधून महामार्गाच्या दिशेने युरीयाची संशयास्पद वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती बोईसर पोलिसांना गुरूवारी 5 आँगस्ट रोजी सायंकाळी प्राप्त झाली होती. त्यानुसार बोईसर पोलिसांनी बेटेगाव चौकीवर टेम्पो क्रमांक एमएच 48 टी 9844 याची तपासणी केली असता टेम्पो मध्ये बेकायदेशीर पणे युरियाचा मोठा साठा आढळून आला. विशेष म्हणजे पोलिसांनी वाहनांची तपासणी केल्यानंतर या वाहना सोबत कोणत्याही प्रकारची युरिया बाबत कागदपत्रे आढळून आलेली नव्हती. नऊ टन युरियाचा साठा असलेला ट्रक बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतल्यानंतर ट्रक मालकांने बनावट तयार केलेली बिले काही तासानंतर बोईसर पोलिसांना दाखवल्याची माहिती समोर आली आहे. याचवेळी पोलिसांनी युरियाचा बेकायदेशीर साठा घेवून जाणाऱ्या ट्रक मालकाला ताब्यात घेणे जरूरी होते. मात्र यावेळी पोलिसांनी नेमकी कोणती संधी शोधण्यासाठी वेळ घालवला असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बोईसर पोलिसांनी केलेल्या कारवाई नंतर टेम्पो मालकांने बनावट सादर केलेल्या बिलावर युरिया भिवंडी येथील कृष्णा सोल्वकेम लिमिटेड या कंपनीतून गुजरात राज्याच्या भरुच जिल्ह्यातील पनोली स्थित हिकल लिमिटेड या कंपनीत पाठविला जात असल्याचे बिल कागदपत्रा नुसार समोर आले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला टेम्पो नरेश रोडलाईन चे मालक नरेश जैन यांच्या मालकीचा असून बोईसर मधील प्रख्यात युरिचा माफिया राठोड नामक व्यक्तीचा हा युरिया साठा असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून टेम्पो मालक नरेश जैन हा गुजरात मध्ये फरार झाल्याची खात्रीलायक माहिती समोर आली असून बोईसर पोलिसांचा तपास देखील गुलदस्त्यातुन बाहेर कधी पडेल हे पाहणेच औचित्यांचे ठरणार आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी बोईसर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलताना हा ट्रक नेमका कोणचा आहे याचा तपास सुरू असून ट्रक मध्ये असलेल्या युरिचा तपासणी अहवाल आल्यानंतर कारवाई करू असे नेहमी प्रमाणे उत्तर दिले.
◾बोईसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा युरियाचा साठा औद्योगिक क्षेत्रातील प्लाँट नंबर डब्ल्यू 11 मधून वाहतूक केला गेल्याचे सांगितले असले तरी या कारखान्यांची तातडीने तपासणी केली आहे का याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती पोलिसांन कडून मिळालेली नाही.
◾पालघर जिल्ह्यातील शेतीच्या वापरासाठी येणारे युरिया खत तारापूर औद्योगिक वसाहती मधील रासायनिक व कापड निर्मिती कारखान्यांमध्ये वापरण्यात येत असल्याचे प्रकार समोर आले होते.
औद्योगिक वसाहतीमध्ये युरियाचा काळाबाजर करणारे युरिया माफिया सक्रिय असून मोठ्या प्रमाणात शेतीच्या वापरायोग्य युरिया औद्योगिक वसाहती मध्ये गोण्या बदलून आणला जातो.