◾ गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी ग्रामपंचायतीची उपाययोजना; विक्रेत्यांची यादी बनवुन देण्यात आले पास
पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: संपूर्ण देशात संचारबंदी लागल्या नंतर देखील जीवनावश्यक गोष्टींची खरेदी करण्यासाठी नागरीक एकच गर्दी करत आहेत. अशा गर्दीमुळे करोना विषाणूची लागण होण्याची शक्यता जास्त असल्याने आता बोईसर मध्ये यावर ग्रामपंचायतीने एक उत्तम पर्याय निवडला आहे. ग्रामपंचायतीने विक्रेत्यांच्या मार्फत जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा नागरीकांना घरपोच होण्यासाठी एक यंत्रणा निर्माण केली आहे. यामुळे आता बोईसर मधील नागरीकांना एका फोनवर घरपोच सुविधा मिळणार आहे.
बोईसर परिसरात असलेली देशातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत व अणुऊर्जा प्रकल्प यामुळे याठिकाणी लोकसंख्या देखील मोठी आहे. करोना ला लढा देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असले तरी नागरीक देखील जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. काही दिवसापूर्वी ग्रामपंचायतीने सर्कस मैदानात भाजी मंडई भरवली होती. परंतु बोईसर परिसरातील अनेक भागातुन एकाचवेळी नागरीकांनी मोठी गर्दी केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणा बाहेर गेलेली. संचारबंदी असली तरी जीवनावश्यक गोष्टी नागरीकांना वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी बोईसर ग्रामपंचायत सज्ज झाली आहे. यामध्ये दुध, किराणा, चिकन, मटण, अंडी, भाजी अशा जीवनावश्यक गोष्टी लोकांना घरपोच मिळाव्यात याठिकाणी विक्रेत्यांना एकत्र करून त्यांना ग्रामपंचायती कडुन पासेस देण्यात आले आहेत.
बोईसर ग्रामपंचायतीने नागरीकांन साठी घरपोच देण्यात येणारी सेवा यामुळे बोईसर मुख्य रस्त्यावर नागरीकांची होणारी रेलचेल कमी होण्यासाठी मदत होणार आहे. ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाचे नागरीकांन कडुन देखील स्वागत केले जात असुन खरेदी साठी होणारी नागरीकांची धावपळ बंद होणार आहे. ग्रामपंचायतीने बोईसर हद्दीतील 48 किराणा दुकान, 52 चिकन मटन दुकानदार, 7 होलसेल, 120 भाजी विक्रेते व दुध विक्रेते अशांना पास देण्यात आले आहेत. नागरीकांना विक्रेत्यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले असुन फोन करून जीवनावश्यक वस्तू घरपोच नागरीक मागवून घेताना दिसत आहेत.