◾ बेकायदेशीर टँकर पाणीपुरवठा दाखल गुन्ह्यात कारखान्यांचा मालक व व्यवस्थापक मोकाट
◾ स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना नेमका दबाव कोणाचा?
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एक प्रदूषणकारी कारखान्याला प्रशासन नेहमीच मोकळीक देत आल्याचे आजवर दिसून आले आहे. असाच प्रकार पुन्हा घडला असून कारखान्यात बेकायदेशीर पाणीपुरवठा करताना पकडण्यात आलेल्या टँकर बाबत मालक व मुख्य व्यवस्थापकाला मोकळीक देण्यात आली आहे. याबाबत बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असला तरी कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई कारखानदारांवर झालेली नसल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना नेमका कोणाचा दबाव आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लाँट नंबर जी- 35 या विराज प्रोफाइल कारखान्यात बेकायदेशीर टँकरने पाण्याचा पुरवठा करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटने 29 एफ्रिल 2021 रात्रीच्या वेळी पकडले होते. औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा विभागाकडून केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा व्यतिरिक्त इतर मार्गाने पाणीपुरवठा घेणे बेकायदेशीर आहे. असे असले तरी विराज प्रोफाइल लिमिटेड हा कारखानदार बेकायदेशीर पणे टँकरने चोरटा पाणीपुरवठा गेल्या अनेक वर्षांपासून करत होता. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर क्रमांक एमएच 04 एफडी 8346 कारवाई केली. यामुळे प्रदूषकारी विराज प्रोफाइल कारखान्यावर ठोस कारवाई होईल अशी खात्री नागरीकांन कडून व्यक्त केली जात होती. मात्र बोईसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात टँकर व टँकर मालकांवर कारवाई करून कारखाना मालकांला व मुख्य व्यवस्थापकाला कारवाई पासून दुरच ठेवण्यात आले. कारखाना मालक व मुख्य व्यवस्थापकावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याने गुन्हे शाखेवर नेमका कोणाचा दबाव आला हा सवाल उपस्थित केला जात असून कारखाना मालक व मुख्य व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिकांन कडून केली जात आहे.
◾ विराज प्रोफाइल कारखान्यात मोठ्या प्रमाणात लोखंडावर रासायनिक प्रक्रिया केली जाते. प्रमाणापेक्षा अधिक उत्पादन घेण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा कडून मंजूर पाणीपुरवठा साठ्यापेक्षा अधिक पाण्याची आवश्यकता असल्याने हा कारखानदार चोरट्या पध्दतीने टँकरने खुलेआम पाणीपुरवठा घेतो. तसेच रासायनिक प्रक्रिया केल्यानंतर निघणारे आम्लयुक्त रासायनिक सांडपाणी कोणत्याही प्रकारची ठोस प्रक्रिया न करताच सोडून दिले जाते.
◾विराज प्रोफाइल टँकर पाणीपुरवठा दाखल असलेल्या गुन्ह्यात कारखान्यांचे मालक व व्यवस्थापकाला दिलेली मोकळीक याबाबत अधिक माहिती विचारण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटचे पोलिस उपनिरीक्षक यांना प्रतिक्रिया जाणुन घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिक्रिया मिळू शकली नाही.