◾ बोईसर नगरपरिषद बाबत पालघर दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री नेमकी काय घोषणा करणार याकडे लागले बोईसर वासीयांचे लक्ष
◾ शिवसेना बालेकिल्ला असलेल्या पालघर जिल्ह्यात नागरिकांना करावी लागते शहराची प्रतिक्षा
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: पालघर जिल्हा निर्मिती नंतर बोईसर वासीयांना अधिकृत शहराचा दर्जा मिळेल असा स्वप्नात असलेल्या बोईसर वासीयांचा भ्रमनिरास आजवर झाला आहे. मात्र यावेळी पालघर जिल्हा मुख्यालय इमारतीच्या लोकार्पण सोहळा साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत असल्याने ते बोईसरला शहराचा दर्जा देण्याबाबत नेमकी काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे अनेक वर्षांपासून नगरपरिषदेचे भिजते घोंगडे मुख्यमंत्री मार्गी लावणार का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शिवसेनेच्या स्थानिक बोईसर मधील पदाधिकारी यांनी सुरूवाती पासून बोईसर नगरपरिषद व्हावी यासाठी पाठपुरावा केला होता. नवनिर्वाचित पालघर जिल्ह्याचे पहिले जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी बोईसर नगरपरिषद बाबत सकारात्मक प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवला होता. मात्र त्याबाबत शासनाने जिल्हा परिषद ठराव बाबत जेव्हा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे आला त्यावेळी इतर तालुक्यातील एका जिल्हा परिषद सदस्यांने त्याला विरोध करत तो प्रस्ताव शिवसेना भाजप सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेने नामंजूर केला होता. यामुळे बोईसरला राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या राजकारामुळे शहराचा दर्जा मिळू शकला नव्हता. शिवसेना पुन्हा पालघर जिल्हा परिषदेत सत्तेवर आल्यावर बोईसर मधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोईसर नगरपरिषद बाबत पुन्हा आवाज उचलल्यानंतर जिल्हा परिषदेने देखील सकारात्मक ठराव शासनाकडे सादर केला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे देखील बोईसर वासीयांनी अनेकदा पाठपुरावा केला असला तरी याबाबत निर्णय तातडीने व्हावा याठिकाणी ते देखील कमी पडल्याचे आजवर दिसून आले आहे.
बोईसरची लोकसंख्या ही लाखोच्या घरात असून दिवसेंदिवस बोईसरचे नागरीकरण झपाट्याने वाढत चालले आहे. भाजप शिवसेना काळात देखील बोईसर नगरपरिषदेची आवश्यकता असल्याचे त्याबाबत तातडीने निर्णय घेतला जाईल असे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी बोईसर मध्ये एका कार्यक्रमात असताना साधारणपणे चार वर्षाअगोदर सांगितले होते. मात्र बोईसरला शहर दर्जाचा देण्याचा प्रस्ताव लालफितीत गुंडाळून पडलेला आहे. पालघर जिल्हा मुख्यालय इमारतीचे लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पालघर मध्ये येत असल्याने हा विषय पुन्हा चर्चेचा विषय बनला असून यावेळी मुख्यमंत्री बोईसर वासीयांचा विचार करतील अशी आशा बोईसर वासीयांना आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री बोईसर मार्गेच पालघर जिल्हा मुख्यालय ठिकाणी जाणार असल्याने या संपूर्ण रस्त्यांची डागडुजी व याभागातील साफसफाई प्रशासनाने केली असून संपूर्ण रस्त्यावर शिवसेनेने स्वागताचे फलक लावले आहेत. मात्र हेच बोईसर मधील सर्व डजनभर नेते बोईसरच्या नगरपरिषद बाबत मुख्यमंत्र्यांंना गाऱ्हाणे घालणार का असा सवाल बोईसरवासी उपस्थित करत आहेत.
◾ बोईसर नगरपरिषदेची स्थापना झाल्यावर येथील विकासाला गती मिळण्याची शक्यता आहे. बोईसरचा कारभार सांभाळणे ग्रामपंचायतीच्या आवाक्या बाहेर आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या संपूर्ण भागात सर्वसामान्य नागरिकांच्या बोईसर नगरपरिषद मागणी कडे वरिष्ठ नेते देखील दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांन कडून केला जात आहे.
◾ शिवसेनेचे पालघर संपर्क प्रमुख आमदार रविंद्र फाटक यांनी देखील बोईसर नगरपरिषदे बाबत एकदाही ठोस पाठपुरावा मुख्यमंत्री यांच्या कडे केलेला दिसून आलेला नाही. स्थानिक नेते पाठपुरावा करत असले तरी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या महत्त्वाच्या विषयाकडे म्हणावे तसे लक्ष दिलेले नाही. यामुळे आता बोईसर वासीयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय घोषणा करतात याकडेच पाहावे लागणार आहे.