◾जिल्हा परिषद सदस्यांनी देखील मुख्यालयात प्रवेश नाकारला; प्रशासनामध्ये नियोजनाचा अभाव
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
पालघर: जिल्हा मुख्यालयाचा लोकार्पण सोहळा घाईगडबडीत आँनलाईन पद्धतीने पार पडला आहे. सुरूवाती पासूनच मुख्यमंत्री यांचा दौरा अनिश्चित असल्याचे दिसून आले होते. यामुळे या भव्य जिल्हा संकुल लोकार्पण सोहळा नियोजनाच्या अभावात घाईघाईने आँनलाईन पध्दतीने गुरुवारी पार पडला. राज्यातील सर्वात मोठे व सुसज्ज असलेल्या जिल्हा संकुलाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहु शकले नसल्याने स्थानिक शिवसेना नेत्यांचा हिरमोड झाला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पालघर दौऱ्याबाबत अनिश्चितता कायम होती.बुधवारी उशिरा रात्री पर्यंत मुख्यमंत्र्यांचा दौऱ्याचा कार्यक्रम करण्यात आला नव्हता. अन्य मंत्र्यांचा दौरा कार्यक्रम बुधवारी रात्री जाहीर करण्यात आला होता. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांकडून नवीन प्रकल्पांच्या घोषणा करण्याची शक्यता होती. परंतु मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि महसूल मंत्र्यांनी लोकार्पण सोहळ्यात येणे टाळल्याने लोकार्पण सोहळा कार्यक्रमाची रंगतच निघून गेली होती. दरम्यान मुख्यमंत्री येणार म्हणून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लाखो रुपये बॅनरबाजीवर खर्च आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रवासाच्या रस्त्याची दुरुस्ती आणि रंगरंगोटीवरील खर्च पाण्यात गेला आहे.
पालघर जिल्हा प्रशासनाने प्रमाणापेक्षा अधिक कार्यक्रमासाठी प्रवेश पास दिल्याचे समोर आले होते. मंत्री व आमदार यांच्या सोबत अनेकांनी कार्यक्रम स्थळी प्रवेश घेतला. यामुळे काही वेळानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रवेश ओळखपत्र असून सर्वांना प्रवेश नाकारण्यात आला होता. याचा फटका पत्रकारांना देखील बसला असून प्रवेश ओळखपत्र असून देखील काही काळ प्रवेश नाकारण्यात आला होता. असे असले तरी मंत्र्यांना व वरिष्ठ पोलिसांनी वसीला लावल्यानंतर अनेक स्थानिक नेत्यांना मुख्यालय प्रवेश देण्यात आला होता.
◆शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांना लोकार्पण सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रम स्थळावर प्रवेश नाकारण्यात आल्याने शिवसैनीकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
◆जिल्हा मुख्यालयाच्या उद्घाटनात जिल्हा परिषद सदस्यांना डावलून जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
◆ओळखपत्र नसताना अनेक अनोळखी व्यक्तींचा वावर कार्यक्रम स्थळी होता. दरम्यान ओळखपत्र असूनही जिल्हा माहिती अधिकारी राहुल भालेराव, पालघरचे गटविकास अधिकारी चंद्रशेखर जगताप, जिल्हा परिषद सदस्या भावना विचारे यांना प्रवेश नाकारण्यात आला होता.
◆नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार रवींद्र फाटक यांचे चालक आणि सुरक्षा रक्षक ओळखपत्रे नसताना कार्यक्रम स्थळी दाखल झाले होते.