◾लोकाभिमुख विकास कामांना प्राधान्य देऊन नविन इमारतीचा नावलौकिक वाढवावा
पालघर दर्पण: वार्ताहर
पालघर: जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती आणि आदिवासी लोककला प्रसिद्ध असताना वारली चित्रकलेचा नावलौकिक जागतिक स्तरावर पोहचला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विकास कामे करताना आदिवासी संस्कृती आणि परंपरेचे जतन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.गुरुवारी जिल्हा मुख्यालयाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात आभासी पद्धतीने मुख्यमंत्री सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद कार्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या इमारतींचे ऑनलाईन पध्दतीने लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,महसुल मंत्री बाळासाहेब थोरात,मुख्य सचिव सीताराम कुंटे आभासी पध्दतीने लोकार्पण कार्यक्रमात सहभागी झाले होते.पालघरच्या कार्यक्रमात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दूल सत्तार,पालघर जिल्हा परिषद अध्यक्षा वैदही वाढाण,खासदार राजेंद्र गावीत,आमदार श्रीनिवास वनगा,सुनिल भुसारा,राजेश पाटील,विनोद निकोले, रविंद्र पाठक,कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील,सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी,कोकण परिक्षेत्र उपमहानिरिक्षक संजय मोहिते,सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.कैलास शिंदे, जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधिक्षक दत्तात्रेय शिंदे आणि अधिकारी उपस्थित होते.
पालघर जिल्ह्याला सागरी, नागरी आणि डोंगरी भौगोलिक भूभाग लाभला आहे. त्यामुळे जिल्ह्याला नैसर्गिक आपत्तीचा धोका कायम असतो.तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत वाटपाचे काम सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोना काळात केलेल्या उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या घटली आहे.कोरोना विषाणूच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा प्रशासनाने ऑक्सीजन प्रकल्प उभारला असून ऑक्सीजनच्या बाबतीत जिल्हा स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.आगामी काळात कोणत्याही नैसर्गिक संकटात तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्याच्या आदिवासी संस्कृतीला व परंपरेला चालना देण्याचे काम जिल्हा प्रशासनाने करावे.जिल्ह्यातील चिकु सारखे फळ साता समुद्रापार गेले आहे.सर्व घटकांना गती देऊन जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण करावी. जिल्ह्यामध्ये औद्योगिकरणामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.उद्योजकांना विविध सवलती देऊन गुंतवणुक करण्यास उद्योजकांना प्रोत्साहन देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.
तोक्ते चक्रीवादळात मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छिमारांना जिल्हा प्रशासनाच्या कार्यतत्परतेमुळे जिवीत हानी टाळता आली आहे.स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या काळात नविन इमारतीचे लोकार्पण अभिमानास्पद बाब आहे.जिल्हा मुख्यालयाची सुसज्ज इमारत देशामध्ये वेगळी ओळख निर्माण करेल असा विश्वासही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
नविन वास्तुमध्ये काम करताना नागरिकांच्या गरजांकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.जनतेच्या सेवेसाठी असल्याने अधिकारी व नागरिकांमधील बांधिलकी टिकणे महत्त्वाचे आहे. जव्हार येथिल राजवाड्याच्या कलाकृतीवरून सिडकोने निर्माण केलेल्या जिल्हा प्रशासनाची कलात्मक स्थापत्याचा अनोखा अविष्कार असलेली अशी भव्य वास्तू साकारण्यात आली आहे.शासकीय कार्यालयाची अशी वास्तू संपूर्ण देशात नाही. या वास्तूमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सर्व समाज घटकांना समान न्याय देऊन जिल्ह्याचा विकास साधावा. या वास्तूमुळे जिल्ह्याच्या विकासांना चालना मिळेल असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.