◾राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून वेठबिगारी व त्रासाला कंटाळून कातकरी आदिवासी इसमाची आत्महत्या
◾ विक्रमगड आमदार सुनील भुसारा यांच्या जवळच्या समर्थक रामदास कोरडे वर गुन्हा दाखल;
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
पालघर: देशात स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्षे साजरे केले जात असताना आपल्या लहानग्यांच्या मृत्यू पश्चत त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारे कफन घेण्यासाठी उधारीवर घेतलेल्या पैश्यासाठी वेठबिगिरीच्या माध्यमातून राब-राब राबविण्याच्या जाचाला कंटाळून एका गरीब ,हतबल पित्याला आत्महत्या करण्याचा दुर्दैवी प्रकार जव्हार मध्ये घडला.राष्ट्रवादीचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा ह्यांच्या मतदार संघात हा अश्लाघ्य प्रकार घडला असून आरोपी हा राष्ट्रवादी चा पदाधिकारी आहे. आरोपीवर मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
पालघर जिल्ह्यातील मोखाडा या दुर्गम तालुक्यात आसे गावातील काळू पवार (वय 48) या मजुरी करून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका गरीब बापावर अशी दुर्दैवी वेळ आली आहे. आपल्या मुलाच्या अंत्यसंस्कारा दरम्यान त्याच्या कफनासाठी घेतलेल्या पैश्याची परतफेड करण्यासाठी वेठबिगारी करण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली होती. 2020 च्या दिवाळी सणाच्या 5 दिवस अगोदर त्यांचा सर्वात छोटा मुलगा दत्तू पवार (वय 12) याचा मृतदेह एका खोल दरीत आढळला होता. मजूरीचे काम करणाऱ्या काळू पवारयांच्या कडे आपल्या मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसेही नव्हते. त्यांनी मुलाच्या अंत्यसंस्काराचे साहित्य, कफन घेण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पदाधिकारी असलेल्या रामदास कोरडे या मालकाकडून अवघे 500 रुपये उसने घेतले होते. ते पैसे फेडण्यासाठी रामदास कोरडेने काळुला गडी म्हणून राबवून त्याचू पिळवणूक करत सतत त्रास दिल्यानेच त्या जाचाला कंटाळून अखेर त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोप त्याची पत्नी सावित्री पवार हिने आपल्या तक्रारीत केला आहे.
राज्य स्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष तथा, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या मोखाडा तालुक्यातील कातकरी वाड्यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान ही घटना उघडकीस आली होती. मुलाच्या कफनासाठी घेतलेल्या पैशाची परतफेड करण्यासाठी काळू मालकाकडे गडी म्हणून राबत होता. शेती नांगरणे, गुरे हाकणे अशी कामं तो करत असे. परंतु नहामी मालकाकडून त्याला मारहाण तसेच शिवीगाळ होत असे. आत्महत्येच्या दोन दिवस अगोदर तब्बेत ठीक नसल्यामुळे काळू कामावर गेला नाही म्हणून मालक रामदास याने त्याला मारहाण केली होती. त्यामुळे बाबा प्रचंड तणावात असल्याचे थोरली मुलगी धनश्री सांगतले आहे. त्यामुळे मालक रामदास कोरडे याच्या जाचाला कंटाळून काळू याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा पवार कुटुंबीयांनी आरोप केला होता.
गरिब मजुराला वेठबिगारी करण्यासाठी लावणारा व त्याला त्रास देवुन मारहाण करणाऱ्या राष्ट्रीय युवक काँग्रेसचा पदाधिकारी असलेल्या मालक रामदास कोरडे वर गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब लावला जात होता. याबाबत विवेक पंडित यांनी जातीने लक्ष दिल्यानंतर मालक रामदास अंबु कोरडे याच्या विरोधात मोखाडा पोलिस ठाण्यात “बंधबिगार पद्धती (उच्चाटन) अधिनियम १९७६” अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोखाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असला तरी अद्यापही आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले नाही. आरोप हा विक्रमगड आमदार सुनील भुसारा यांचा जवळचा समर्थ असल्याने पोलिस दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला जात आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांतील पदाधिकाऱ्यांने केलेल्या निंदनीय कृत्याबद्दल नेमकी काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे. आरोपी हा राष्ट्रीय युवक काँग्रेसचा पदाधिकारी व आमदार सुनील भुसारा यांचे समर्थ असल्याने पाठीशी घातले जात असल्याबाबत होणाऱ्या आरोपा बाबत विचारण्या करण्यासाठी संदेश पाठवून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता याबाबत कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
◾स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देखील कातकरी शेतमजुराला मुलाच्या कफनासाठी वेठबिगारी करावी लागली आणि वेठबिगारीच्या पाशात अडकुन आत्महत्या करावी लागते ही अत्यंत गंभीर, वेदनादायी आणि व्यवस्थे बाबत चीड आणणारी घटना आहे असे म्हणत पंडित यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. अशा घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता तातडीने कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचेही पंडित यांनी म्हटले आहे.