◾रेल्वे कडून भरीव मोबदला मिळावा यासाठी राजकारणी अनधिकृत बांधकामे करण्यासाठी सरसावले
◾बोईसर महसूल क्षेत्रातील अनधिकृत बांधकामासाठी तलाठी मेहरबान
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: रेल्वे चौपदरीकरणासाठी पाचपट मोबदला मिळत असल्याने रेल्वे लगत अनधिकृत बांधकामांनी वेग घेतला आहे. बोईसर काटकर पाडा भवानी चौक व वंजारवाडा भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहिली असून या अनधिकृत बांधकामाकडे महसूल विभागाने देखील दुर्लक्ष केले आहे. बोईसर विभागाचे तलाठी देखील या अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला जात आहे. यातच एका रात्रीच बांधकाम उभे करण्याचा प्रयत्न भवानी चौक येथे झाल्याचे दिसून आले आहे.
बोईसर परिसरात पावलापावलावर अनधिकृत बांधकामे उभे राहिले आहे. मात्र भुमाफियांच्या वजनाखाली अडकलेल्या तलाठ्यांन मुळे कोणत्याही प्रकारची कारवाई याठिकाणी होत नाही. बोईसर काटकर पाडा येथील भवानी चौक भागात सर्वे नंबर १२२ मधील सरकारी जागेवर एक दिवसात अनधिकृत बांधकाम उभे राहिले आहे. रेल्वे लगत असलेल्या या जागेवर अनधिकृत बांधकाम करण्यासाठी अतिशय घाई करण्यात आली. याचे कारण असे की, याभागातुन रेल्वेचा रस्ता जाणार आहे. तसेच भुयारी मार्ग बनविण्याचे नियोजन देखील रेल्वेचे असल्याने यासाठी अनधिकृत बांधकाम करून लाखो रुपयांचा मोबदला रेल्वे कडून पदरात पाडण्याचा डाव येथील भुमाफियांचा असल्याचा आरोप केला जात आहे. मुख्य रस्त्यावर एकावर एक उभारलेल्या बांधकामाकडे स्थानिक बोईसर तलाठी यांनी देखील लक्ष दिले नसल्याने नवल व्यक्त केले जात आहे.
रेल्वे फाटकाच्या पुर्वेला असलेल्या वंजार वाडा भागात अनेक घरे रेल्वेच्या चौपदरीकरणासाठी जात असल्याने त्यांना कोट्यवधी रूपयाचे मोबदला देण्यात आली. याच काही भागात मोकळ्या असलेल्या आदिवासी व इतर जागेवर बेकायदेशीर चार ते पाच मजल्याच्या इमारती देखील उभारण्यात आल्या आहेत. गेल्या टाळेबंदीत या इमारती उभ्या राहिल्या असून या अनधिकृत इमारती कडे महसूल विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांन कडून केला जात आहे. यातच याठिकाणी काही सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामाजवळ भुयारी रेल्वे मार्ग जाण्याची शक्यता असल्याने पुन्हा मोबदला मिळेल या आशेने अनधिकृत बांधकामे जोमाने याठिकाणी उभी राहत असल्याचा आरोप स्थानिकांन कडून केला जात आहे.