◾लॉकडाऊन मुळे वाहन नसल्याने बाईकवरून आणला मृतदेह; उपचार पुर्ण होण्याअगोदरच सोडल्याने आदिवासी नागरीकांचा दुदैवी मृत्यू
पालघर दर्पण: विषेश प्रतिनिधी
पालघर: करोना विषाणू पासुन बचाव होण्यासाठी देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. बंद झालेली वाहतूक यामुळे दोन मुलांना आपल्या वढीलांचा मृतदेह बाईकवरून नेण्याची दुदैवी वेळ आली आहे. कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना उपचार पुर्ण होण्या अगोदरच रुग्णाला सोडल्याने रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. परिणामी लॉकडाऊन मुळे रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प असल्याने मुलांना आपल्या वढीलांचा मृतदेह चक्क बाईकवरून घरी आणावा लागला आहे.
डहाणू तालुक्यातील चिंचारे येथे राहणारे लडका वावरे यांना 24 मार्च रोजी सकाळी सर्पदंश झाला होता. उपचारासाठी त्यांना कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल. उपचार पूर्ण झाल्याचं सांगत कासा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना दुसऱ्या दिवशी सुट्टी देत घरी जाण्यास सांगितले. घरी असताना दोन दिवसांनी त्यांना पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या मुलांनी त्यांना रुग्णालयात घेवुन जाण्यासाठी निघाले. मात्र वाटेत त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर घरी जाण्यासाठी कोणतेही वाहन मिळाले नसल्याने त्यांच्या दोन्ही मुलांनी बाईकवरूनच घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. कासा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरने त्यांच्यावर योग्य उपचार केले नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे. या घटनेमुळे पालघर मधील खिळखिळी आरोग्य वेवस्था व प्रशासनाचा बेजबाबदार पणा चव्हाट्यावर आला असुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.