तारापूर मधील स्फोटात दोघांचा मृत्यू तर पाच कामगार गंभीर जखमी
मृतांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी दिला नकार
पालघर दर्पण: वार्ताहर
पालघर: तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कापड निर्मिती करणाऱ्या कारखान्यात शनिवारी पहाटे सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात दोन कामगारांचा जळून मृत्यू झाला असून मृतदेह जळलेल्या अवस्थेत असल्याने मृतांची ओळख पटवणे देखील जिकरीचे झाले होते. यातच कारखानदारांने कोणत्याही प्रकारची मदत जाहीर केली नसल्याने मृतांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नकार दिला आहे.
तारापूर औद्योगिक वसाहती मधील जखरिया टेक्स्टाईल या कारखान्यात शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाला. स्फोटामुळे कारखान्याला आग देखील लागली होती. स्फोट झाला त्याठिकाणी कारखान्यात सात कामगार काम करीत होते. भिषण स्फोटात मिथिलेश राजवंशी व छोटे लाल सुरज या दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर अरविंद यादव, मुरली गौतम, अमित यादव, मुकेश यादव आणि उमेश राजवंशी अशी जखमींची नावे आहेत. कारखानदारांने मृतांच्या नातेवाईकांना कोणत्याही प्रकारची मदत जाहीर न केल्याने व मृतांच्या नातेवाईकांच्या मागणी कडे दुर्लक्ष केल्याने नातेवाईकांनी मृतदेह बोईसर पोलिस ठाण्यात आणला होता. पोलिसांनी लागलीच मृतदेह घेवून येणारी रुग्णवाहिका माघारी फिरवली. मात्र जिथपर्यंत मृतांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई मिळत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.
◾स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले होते.दोन तासांच्या प्रयत्नांनी कारखान्याला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.दरम्यान स्फोटाच्या तीव्रतेमुळे तीन ते चार किलोमीटरचा परिसरात स्फोटाचा आवाज ऐकू आला.
◾शिवसेनेच्या निलम संखे यांचे आंदोलन..
स्फोटाच्या ठिकाणी भेट देण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांनी झाडून हजेरी लावली. मात्र मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळावा यासाठी शिवसेनेच्या निलम संखे यांनी शनिवारी रात्री उशिरापर्यंत पाठपुरावा करत बोईसर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. तसेच कारखानदारांने मृतांच्या नातेवाईकांना मोबदला देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नसल्याने रविवारी सकाळी निलम संखे यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी सोबत घेवून कारखान्यांच्या गेटवर आंदोलन केले. आंदोलन केल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रूपये कंपनी कडून देणार असल्याचे लेखी देण्यात आले तसेच अंतिम संस्कारासाठी प्रत्येकी 50 हजार रूपये तातडीने देण्यात आले. जखमींचा खर्च व इतर मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.