◾ घोलवडेचे वैद्यकीय अधिकारी उमेश अहिरे औद्योगिक क्षेत्रातील सियाराम कंपनीत लसीकरण करताना सापडले
◾ पालघर दर्पणच्या खात्रीशीर सुत्रांकडून माहिती मिळताच शिवसेनेच्या निलम संखे यांनी टाकली कारखानत धाड
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: सर्वसामान्य नागरिकांना कोविड लसीची कमतरता भासवून लसीची काळाबाजारी करण्याचे काम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुरू केले आहे. असाच एक प्रकार पालघर दर्पणच्या विशेष प्रयत्नांनी उघड झाला असून घोलवडच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांने कोविडचे डोस थेट तारापूर औद्योगिक क्षेत्रात विकत असल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील एका कारखान्यात पालघर दर्पणला माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेच्या निलम संखे यांनी कारखान्यात धाड टाकून हा संपूर्ण प्रकार चव्हाट्यावर आणला आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लाँट नं. इ 125 या सियाराम सिल्क या कपडा निर्मिती करणाऱ्या कारखान्यात गुरूवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास शासकीय वैद्यकीय बेकायदेशीर लसीकरण करत असल्याची माहिती समोर आली. घोलवड आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उमेश अहिरे यांनी याठिकाणी सुमारे 100 कोविड लसीचे डोस चोरून काळाबाजार करण्यासाठी आणल्याची माहिती पालघर दर्पणचे संपादक हेमेंद्र पाटील यांना खात्रीशीर सुत्रांकडून प्राप्त झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून तातडीने याबाबत सामाजिक कार्यकर्ते शिवसेनेचे पदाधिकारी असलेल्या निलम संखे यांना याबाबत कळविल्या नंतर कारखान्यात धाड टाकण्यात आली. यावेळी कामगारांना कोविड लसीकरण करत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे याठिकाणी वैद्यकीय अधिकारी उमेश अहिरे हे स्वतः उपस्थित होते.
कारखाना प्रशासनाने याअगोदर देखील येथील कामगारांना शासकीय लस चोरट्या मार्गांने वैद्यकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून दिल्याचे उघड झाले आहे. गुरुवारी समोर आलेल्या प्रकारात कंत्राटी कामगारांना लसीकरण करण्यासाठी प्रत्येका कडून 250 रूपये घेण्यात आले होते. हे सर्व जमा केलेले पैसे वैद्यकीय अधिकारी यांना दिले जातात. यातच कंपनी कडून देखील विशेष आर्थिक सहकार्य देखील केले जात असल्याचे समोर येत आहे. ज्यावेळी वैद्यकीय अधिकारी उमेश अहिरे यांना जाब विचारल्यावर त्यांनी याठिकाणी मी सहज आलो होतो. मला माहिती नाही याठिकाणी लसीकरण कोणी केले अशी उडवाउडवीची उत्तर देत कारखान्याच्या दुसऱ्या मजल्या वरून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. डाँक्टर उमेश अहिरे यांचा खोटा मुखवटा समोर आला असून कोविड लसीचा काळाबाजार करणाऱ्या डाँक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
◾ लसीकरणाचा धंदा
पालघरचे तालुका आरोग्य अधिकारी यांच्या वर देखील याअगोदर बेकायदेशीर लसीकरण केल्या बाबत कारवाई करण्यात आली होती. मात्र तरीही आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी सुधारण्याच्या मानसिकते मध्ये नसून कोविड लसीचा काळाबाजार सुरूच ठेवण्यात आला आहे. एकिकडे नागरिकांना दिवसभर रांगेत उभे राहुन देखील लसीकरण करता येत नसताना दुसरी कडे चोरट्या मार्गांने सुरू असलेल्या लसीकरणावर जिल्हा प्रशासनाचे कोणतेही लक्ष नसल्याने दिसून येते.