◾ सरावली गावाचा विरोध असताना देखील संपर्क प्रमुखांनी केले दुर्लक्ष; शिवसेना बालेकिल्ला असलेल्या गणात भाजपचे कमळ
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: गेल्या अनेक दशकांपासून अनधिकृत बांधकाम व भंगार गल्लीतील मतांवर राजकारण करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्याला पोट निवडणुकीत जोरदार फटका बसला आहे. सरावली पंचायत समितीची शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या अस्तित्वाची महत्त्वाची असलेल्या जागेवर भाजपाच कमळ उगवले आहे. यामुळे अवधनगरच्या राऊळांचा हट्ट पुरविण्यासाठी ठाणेच्या शिलेदारांनी हातची एक जागा गमवली आहे. विशेष म्हणजे यावेळी गावातील स्थानिक लोकांनी शिवसेनेला दुरू ठेवल्याचे चित्र दिसून आले आहे. यामुळे येणाऱ्या काळात शिवसेनेला मोठा फटका बोईसर भागात देखील बसण्याची शक्यता आहे.
सरावली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच वैभवी विजय राऊत यांना शिवसेने कडून पंचायत समितीच्या निवडणूकीत सरावली गण क्रमांक 84 साठी उमेदवारी देण्यात आली होती. शिवसेना सोडून राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करून पुन्हा शिवसेनेत राजकारण करण्यासाठी आलेल्या अवधनगर येथील प्रभाकर राऊळ यांच्या हट्टापायी संपर्क प्रमुख रविंद्र फाटक यांनी ही उमेदवारी दिली. सरावली गावाचा विरोध असताना देखील याकडे शिवसेना संपर्क प्रमुख यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे एकाच कुटुंबातील लोकांना उमेदवारी देवून इतर शिवसेनेच्या पदाधिकारी यांना डावलले जात असल्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात होती. यातच येथील ग्रामपंचायत सदस्य दिनेश संखे यांनी देखील मोठी नाराजी दाखवत बंडाचा पवित्रा घेतला होता. निवडणूकीच्या दोन दिवस अगोदर खुद्द एकनाथ शिंदे यांनी प्रभाकर राऊळ व दिनेश संखे यांच्यात समझोता करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र असे असले तरी मतदारसंघात पसरलेला नाराजीचा सुर अगोरच्या रात्री उशिरा पर्यंत आटोक्यात आणता आला नाही.
शिवसेनेचे प्रभाकर राऊळ यांनी गावकऱ्यांचा विरोध असला तरी ही जागा निवडून येईल असे स्वप्न पाहिले होते. दोन चार नेहमीच्या साथीदारांना रात्रीच्या वेळी विशेष मोहिमेवर पाठवले तरी देखील मतदारसंघात आपली विशेष किमया दाखवु शकले नाही. महत्त्वाचे म्हणजे मुसलीम मतदारांनी देखील यावेळी प्रभाकर राऊळ यांना नाकारले असून त्यांची मते इतर उमेदवारांन मध्ये विभागली गेली. याचा मोठा फायदा कधी न दिसणाऱ्या भाजपाला झाला असून नकळत या ठिकाणी कमल उगवले. भाजपच्या रेखा सकपाळ यांना 1253 मते मिळाली असून 181 मताधिक्याने शिवसेनेच्या वैभवी राऊत यांचा पराभव झाला असून राऊत यांना 1072 मतांवर समाधान मानावे लागले. यामुळे नेत्यांचा हट्ट पुरविण्याच्या नादात शिवसेनेने महत्वाची जागा हातची सोडली आहे असेच म्हणावे लागेल.
◾सरावली पंचायत समिती गणात शिवसेनेचे महाराष्ट्र राज्याचे माजी पाटबंधारे उपाध्यक्ष जगदीश धोडी हे देखील सक्रिय नेते आहेत. जिल्हा परिषद सदस्य पौर्णिमा धोडी देखील याच गटातून जिल्हा परिषद सदस्य निवडून गेल्या होत्या. असे मातब्बर नेत्यांची ताकद असताना देखील शिवसेनेला पराभव पत्कारावा लागला.
◾ सरावली अवधनगर पंचायत समिती गण क्रमांक 83 मधून शिवसेनेचे उमेदवार ममता विलास पाटील या 1769 मतांनी निवडून आल्या असून त्यांनी भाजपच्या निर्मीती नापेश संखे यांचा 613 मतांच्या फरकाने पराभव केला आहे. मात्र भाजपच्या निर्मीती संखे यांना 1156 मते मिळाली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया पवार यांना 611 मते मिळाली. यामध्ये या मतदारसंघात कधी दिसून न येणाऱ्या राष्ट्रवादीला अतिशय चांगल्याप्रकारे मते मिळाली आहेत. यातच भाजपने मिळवलेली मते येणाऱ्या काळात शिवसेनेला सरावली मधून मोठ्या पराभवाला सामोरे जाण्यासाठी पुरेशी आहेत.