◾चोरीच्या मालाची खरेदी करणाऱ्यांवर बोईसर पोलिसांचे दुर्लक्ष; भंगार गोदामात येते चोरीचे लोखंड व तांबे
◾अवधनगर येथील पोलिस चौकी फक्त महिन्यातून एकदाच उघडते
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: भंगार माफियांच्या अवैध धंद्यावर दुर्लक्ष करणाऱ्या बोईसर पोलिसांना मुळे भंगार माफियांना मोकळे रान मिळाले असून भंगार माफिया पुन्हा जोमाने कामाला लागले आहेत. औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यातील चोरीचे लोखंड व तांब या अवधनगर येथील भंगाराच्या दुकानात विकले जाते. यातच वाडा येथील बंद कारखान्यातील चोरीचे लोखंड अवधनगरच्या भंगार माफियांनी आणले असल्याचे उघड झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत अनेक गुन्हे या माफियांवर दाखल करण्यात आले आहेत. मात्र बोईसर पोलिस ठाण्याचे अधिकारी फक्त अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वजनदार कागदी कवर घेण्यातच समाधान मानताना दिसत असल्याचा आरोप नागरिकांन कडून केला जात आहे.
पोलिस ठाण्याचा ठाणे अंमलदार ते पालघरचे पोलिस अधिक्षक या सर्वांना बोईसरच्या भंगार माफियांचा कारणामा अवगत आहे. अधिकारी बदला तरी येथील प्रस्था परंपरा या कायमच असतात. यामुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकरण वाढले असून अशा माफियांना स्थानिक नेत्यांचे पाठबळ देखील मिळत आहे. बोईसर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आपल्या वागण्यातुन साधेपणा व स्वच्छ कारभार दाखवत असले तरी पदभार घेतल्यापासून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई त्यांनी केलेली नाही. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाई नंतर भंगार माफियांची अनेक प्रकरणे उघडकीस आल्याचे आजवर दिसून आले आहे. यामुळे बोईसर पोलिस ठाण्याचे अधिकारी नेमके अवधनगर येथील बंद असलेली चौकी महिन्यातून एकदा खोलून काय साध्य करतात हा संशोधनाचा विषय आहे.
अवधनगरच्या भंगारात आणखी एका भंगार गोडाऊन चा धंदा वाढला असून सद्दाम शहा व संजय गुप्ता नावाच्या इसमांनी स्थानिक नेत्यांच्या सहकार्याने याठिकाणी बेकायदेशीर भंगार गोडाऊन उभारले आहे. सरकारी जागेवर असलेल्या या गोडाऊन मध्ये चोरीचा माल आणला जात असला तरी देखील पोलिसांनी कधी याकडे लक्ष देखील दिलेले नाही. चोरीचे मोटर व भंगार प्रकरणात संबंधित भंगार माफियांवर स्थानिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल काही दिवसांपूर्वी केला होता. यातच वाडा येथील बंद असलेल्या कारखान्यातील भंगार चोरून या ठिकाणी आणले जात होते. विशेष म्हणजे बोईसरचे पोलिस निरीक्षक सुरेश कदम व पोलिस उपनिरीक्षक सुरेश साळुंखे यांच्या कार्यकाळात या सद्दाम नावाच्या इसमाने भंगाराचे बेकायदेशीर गोडाऊन टाकले आहे.
◾बोईसरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून उप पोलिस अधीक्षक असलेल्या नित्यानंद झा यांच्या कडे कारभार देण्यात आला आहे. त्यांनी त्यांच्या कामाच्या पहिल्यांच दिवशी संबंध अधिकाऱ्यांना कायद्याचे धडे दिल्याचे समोर आले होते. यामुळे पुर्वपार सुरू असलेल्या अवधनगर व बोईसर पोलिसांच्या संबंधात कायद्याचे राज्य येईल अशी अपेक्षा बोईसर वासीयांना आहे.
◾ *रजिस्टरची चौकशी गरजेची* …
भंगार माफिया आपल्या कडे भेट देणाऱ्या पोलिसांची ओळख असावी यासाठी एक रजिस्टर ठेवत असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये प्रत्येक महिन्याचा कारभार अचूकपणे लिहलेला असतो. काही दिवसांपूर्वी चोरीच्या प्रकरणातील एका भंगार माफियांवर कारवाई साठी पोलीस गेले असता येथील भंगार माफिया आपल्या कडील संपूर्ण रजिस्टर घेवून उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कडे गेला असल्याची माहिती खात्रीशीर सुत्रांकडून समोर आली. मात्र येथील पोलिसांनी याबाबत संबंधित पोलिसांना माहिती दिल्याचे समोर आले असल्याने माफियाला माघारी यावे लागल्याची जोरदार चर्चा अवधनगरच्या भंगार गल्लीत आहे. यामुळे पोलिस अधीक्षक यांनी याबाबत सखोल चौकशी करून नेमके सत्य बाहेर आणण्यासाठी लक्ष देण्याची गरज आहे.
◾ *कोण आहेत बोईसरचे भंगार वाले* ….
बाबु भंगार वाला, मिनकुल्ला, रिशी गुप्ता, अजिज, इमरान या नावाचे मोठे भंगाराचे गोडाऊन वाले महिन्या काठी बोईसर पोलिसांन वर वजन टाकत असल्याने भंगार गोडाऊनच्या वजन काट्यावर चोरीचा माल खुलेआम तोलता येतो.