◾भाग्यश्री गॅस एजन्सी च्या ट्रक मध्ये सुरू होती गॅस चोरी
पालघर दर्पण: वार्ताहर
पालघर: तारापूर च्या भाग्यश्री गॅस एजन्सी च्या घरगुती गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रक मधून भरलेल्या गॅस सिलिंडरचे सील तोडून मशिनच्या साहाय्याने गॅस काढण्याचा प्रकार दक्ष ग्रामस्थांमुळे उघडकीस आला आहे. याप्रकरणी कारवाईसाठी तारापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास कांबोडे गावचे रहिवासी प्रभाकर पागधरे घिवली कांबोडे तलाव रोडने आपल्या घरी जात असताना त्यांना भाग्यश्री गॅस एजन्सीच्या घरगुती गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पो मध्ये गैरप्रकार सुरू असल्याचे दिसून आले. याबाबत माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली. टेम्पोमध्ये भरलेल्या गॅस सिलिंडरचे सील तोडून मशीनच्या साहाय्याने दुसऱ्या सिलिंडर मध्ये गॅस भरण्यासचे काम सुरू होते. ग्रामस्थांनी भाग्यश्री गॅस एजन्सी च्या ट्रक मधील भरलेल्या गॅस सिलिंडरची पाहणी केली असता गॅस सिलिंडरला सील नसल्याचे दिसून आले. ग्रामस्थ ट्रक जवळ येत असल्याची चाहूल ट्रक मधील कर्मचाऱ्यांना लागल्याने त्यांनी गॅस काढण्याची मशीन घेऊन पळ काढला होता.
याप्रकरणी तारापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. कांबोडे गावातील एकविरा फाऊंडेशनच्या वतीने भाग्यश्री गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून गैरप्रकार करून गॅस ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याने कारवाईची मागणी तारापूर पोलीसांकडे करण्यात आली आहे.