◾बोईसर पोलिसांनी दिली आहे का खुलेआम चोरी करण्याची मुभा; टँकर मधुन केली जाते केमिकलची चोरी
◾ पर्यावरण दक्षता मंचाचे मनिष संखे यांनी केलेल्या तक्रारी कडे का केले पोलिसांनी व तक्रारदारांनी दुर्लक्ष
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: महामार्गावर केल्या जाणाऱ्या आँईल चोरी व केमिकल चोरी प्रमाणे हा गोरखधंदा बोईसर मध्ये देखील तेजीत सुरू आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सत्तर बंगला भागातील एका कारखान्यात आँईल व केमिकलची तस्करी केली जात असून याकडे पोलिस विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे. विशेष म्हणजे पोलिस ठाण्याचा हवलदार ते वरिष्ठ अधिकारी पर्यंत यासर्वांना माफियांचे कामकाज माहिती असताना देखील कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही.

औद्योगिक क्षेत्रातून विविध रासायनिक कारखान्यातुन रसायन भरून घेवून जाणारे ट्रक सत्तरसंबंगला भागातील प्लाँट नंबर डब्ल्यू 187 कारखान्यात आणले जातात. त्याठिकाणी काही प्रमाणात टँकर मधील रसायनाची चोरी केली जाते. चोरी केलेल्या रसायनाची थोडी रक्कम चालक व ट्रान्सपोर्ट मालकाला देखील दिली जाते. विविध प्रकारच्या महागड्या केमिकलची साठवणूक करून त्यानंतर हे केमिकल बेकायदेशीर पध्दतीने इतर ठिकाणी विकले जाते. साधारणपणे दिवसाला याठिकाणी 2 ते 3 लाखा पेक्षा जास्त रक्कमेचे केमिकल याठिकाणी चोरट्या पध्दतीने जमा केले जाते. यातच गुजरात कडून येणाऱ्या अनेक वाहनातून डिजेल व इतर वस्तुची देखील याठिकाणी तस्करी केली जात असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. मात्र याबाबत स्थानिक पोलिसांनी कानाडोळा केल्याचे दिसून येते. महिन्याकाठी पोचवल्या जाणाऱ्या वजनदार कागदी कवर मुळे पोलिसांचा कोणताही विभाग याठिकाणी ढुंकूनही बघत नाही ही वस्तुस्थिती आहे. अनेकदा तक्रारी करून देखील आजवर पोलिसांनी कारवाई का केली नाही हा सवाल देखील उपस्थित राहत आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लाँट नंबर डब्ल्यू 187 या आँईल व केमिकल तस्करी करणाऱ्या कारखान्यातुन 13 जुलै 2021 रात्री उशिरा रासायनिक घनकचरा बेकायदेशीर पणे फेकला जात असल्याचे उघड झाले होते. कोलवडे येथील पर्यावरण दक्षता मंचाचे अध्यक्ष मनिष संखे यांनी केमिकल फेकणाऱ्यांना पकडले होते. यावेळी काहींनी स्थानिक गुन्हे शाखेला कळविल्या नंतर स्थानिक गुन्हे शाखेचा एक अधिकारी घटनास्थळी दाखल झाला. याचवेळी बोईसर पर्यावणाचे मनिष संखे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश साळुंखे यांना येण्यासाठी सांगितल्यावर त्यांनी याठिकाणी दोन पोलिसांना पाठवले. विशेष म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेचा पोलिस चौकशी करत असताना देखील बोईसर पोलिसांनी आल्यावर तपास आपल्या कडे घेत आपल्या परिने चौकशी सुरू केली. यामध्ये काही वेळानंतर बोईसर पोलिस तपास सुरू करतात म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचा अधिकारी माघारी परतला होता. मात्र तिन महिने उलटून देखील बोईसर पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई या केमिकल माफियांवर केलेली नाही. यामुळे स्थानिक गुन्हे शाखेला दुर ठेवत स्वतः चौकशी करणारे बोईसर पोलिसांनी नेमका कोणता सुवर्णमध्य काढला हा चौकशीचा भाग आहे.

बोईसर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक यांच्या सांगण्यावरून मनिष संखे यांनी एक तक्रारी अर्ज देखील पोलिसांना दिला होता. तक्रार दिल्यानंतर कारवाई अधिक करता येईल असे त्यांचे संभाषण होते. मात्र तक्रार अर्ज घेवून नेमके काय साध्य केले हा मोठा प्रश्न उपस्थित राहत आहे. पर्यावरणाचा डंका वाजवणाऱ्या संघटनेचे अध्यक्ष एक तक्रारी अर्ज देवुन शांत का बसले त्यांच्यावर कोणते वजन पडले का असा सवाल नागरिकांन कडून उपस्थित केला जात आहे. स्वच्छ कारभाराचा दावा करणारे पोलिस निरीक्षक सुरेश कदम या संपूर्ण प्रकरणात शांत आहेत की, त्यांना याबाबत कोणतीही कल्पना नाही. पोलिस निरीक्षकांन पेक्षा आता औद्योगिक क्षेत्रात सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक जास्त फेरफटके मारताना दिसत असले तरी पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांनी आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे बोईसर मध्ये माफियाराज वाढविण्यासाठी पाठबळ देण्यासारखे आहे. मात्र आता सत्तरबंगला भागातील केमिकल माफिया व त्याबाबत दिलेल्या तक्रारी चौकशी सुरू होणार का याकडे आता लक्ष देणेच औचित्यांचे ठरणार आहे.
◾पर्यावरण दक्षता समितीचे अध्यक्ष मनिष संखे यांनी औद्योगिक क्षेत्रात प्लाँट नंबर डब्ल्यू 187 याठिकाणी पकडलेल्या रासायनिक घनकचरा बाबत त्यांच रात्री बोईसर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा देखील केला होता. यावेळी मुस्तकीम शेख(उर्फ मुसा) व प्रतिक पाटील यांनी पंच म्हणून हस्ताक्षर केले होते. पोलिसांनी केलेल्या पंचनाम्याचे पुढे काय झाले हा विशेष समोर येत आहे.
◾बोईसर पोलिस ठाण्यात अनेक प्रकरणात तक्रारी अर्ज दिले जातात. कारखानदारांच्या विरोधात दिलेल्या तक्रारी अर्जावर कोणत्याही प्रकारची कारवाई आजवर तरी झालेली दिसून आली नाही. एक दोन विषय सोडले तर प्रत्येक तक्रारी अर्जावर सुवर्णमध्य काढला जातो. तक्रारी अर्ज केल्यानंतर समोरच्या व्यक्तीला चौकशी साठी बोलवले जाते आणि त्यानंतर कायद्याचा धाक दाखवून तडजोड केली जाते.