◾ भंगार व बेकायदेशीर मालवाहू वाहनांन कडून वसुली सुरू; शिट्टी वाजवल्या नंतर होते पुढील प्रक्रिया
◾बोईसर मध्ये दोन वेळा लाचलुचपत विभागाने कारवाई करून सुध्दा पोलिस निरीक्षक सुरेश कदमांची फौज देखील वसुलीत व्यस्त
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: लाचलुचपत विभागाने वर्षभरात दोन वेळा कारवाई करून सुध्दा बोईसर पोलिस ठाणे सुधारण्याच्या मानसिकतेत नसल्याचे दिसून आले आहे. येथील खैराफाटक तपासणी नाक्यावर भंगार, अनधिकृत वाहतूक व अवजड वाहनांना शिट्टी वाजवून थांबवले जाते. मात्र कोणत्याही प्रकारची कागदपत्रे यावेळी तपासली जात नाही. वाहतूक करणाऱ्या इसमांने बंद मुठीत वजनदार कागद आणुन दिल्या नंतर वाहनाला हिरवा कंदील दिला जातो. यामुळे लाचलुचपत विभागाने कितीवेळा तरी कारवाई केली तरी वसुलीची प्रथा याठिकाणी सुरूच राहिली आहे.
बेटेगाव येथील खैराफाटक तपासणी नाक्यावर शिट्टी मारल्या नंतर 50 ते 100 रूपये मिळत असल्याचे पालघर दर्पण कडे प्राप्त झालेल्या चित्रीकरणात उघड झाले आहे. यातच काही ठिकाणी तर महिना बांधला असून नियमबाह्य वाहतूक करणाऱ्यांना या खैराफाटक चौकीवरून हिरवा कंदील दाखवला जातो. चौकीवर उपस्थित असलेला पोलिस याठिकाणावरून जाणाऱ्या वाहनांची कधीही तपासणी करताना दिसत नाही. ज्यावेळी भंगार व इतर अवजड वाहने गेल्यानंतर त्यांना शिट्टी वाजवून थांबवले जाते. त्यानंतर नेहमी प्रमाणे वाहन चालक कोणत्याही प्रकारची कागदपत्रे सोबत घेवून येत नाही. यावेळी फक्त त्यांच्या बंद मुठीत वजनदार कागद असतात. चौकीत असलेल्या टेबलाच्या खणात ते टाकल्यानंतर वाहनाला हिरवा कंदील दिला जातो. कितीही धोकादायक व मानवी जीवाला धोका निर्माण होईल अशा प्रकारच्या गोष्टींची वाहतूक जरी या चौकीवरून केली तरी फक्त काही तुटपुंज्या रक्कमेसाठी संपूर्ण परिसराला धोका निर्माण होऊ शकतो.
खैराफाटक कोस्टल चेक पोस्ट तपासणी चौकीवरून जाणारा रस्ता तारापूर औद्योगिक वसाहती बरोबरच देशाच्या महत्त्वाच्या असलेल्या तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाकडे जातो. यामुळे याठिकाणी पोलिसांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे असताना पोलिस मात्र वेगळ्याच जमवाजमवीच्या मागे लागले आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी खैराफाटक चौकीवर अवजड वाहनांची वाहतूक करण्यासाठी लाच मागणाऱ्या दोन पोलिसांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. यातच या घटनेच्या काही महिन्यातच बोईसर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक यांना देखील लाच घेताना ताब्यात घेतले होते. असे असले तरी बोईसर पोलिस ठाण्यात कोणत्याही प्रकारचा बदल झाले नाही हे मात्र अशा प्रकारामुळे समोर येत आहे. विशेष म्हणजे नव्याने पदभार घेतलेल्या पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांनी काही महिन्यातच या चौकीवरून काही पोलिसांची बदली करून त्याठिकाणी आपल्या मर्जीतील काहींना ठेवल्याची खात्रीलायक माहिती समोर आली होती. यामुळे या चौकीवर प्रत्येक दिवशी जमा होणारी माया कोणाकडे जाते ही संशोधनाची बाब आहे.
◾ पोलिस अधीक्षक यांच्या सुचनेनुसार प्रत्येक पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांना आपल्या कामाच्या नेमणूक केलेल्या ठिकाणाहून फोटो काढून वरिष्ठ अधिकारी यांच्या व्हाट्सएप ग्रुपमध्ये लोकेशन सह टाकावा लागतो. खैराफाटक चौकीवर देखील सायंकाळी नियमित पणे विशिष्ट वेळेत तपासणी सुरू करून त्यांचे फोटो व लोकेशन वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवले जाते. मात्र फोटो प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुन्हा शिट्टी वाजवून वाहने थांबविण्याचे कामकाज सुरू होते.
◾ खैराफाटक चौकीवर बाहेरच्या बाजूला लावलेले सीसीटीव्ही कँमेरे हे फक्त वाहनांचे नंबर दिसण्यासाठी लावले आहेत. वरच्या बाजूला कँमेरे नसल्याने वाहना मध्ये काय वाहतूक होत आहेत याचे कुठलेही चित्रिकरण दिसत नाही. विशेष म्हणजे ज्याठिकाणी बंद मुठीत घेवून येणारे पैसे टेबलाच्या खणात ठेवले जातात. त्याठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारचे सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाही.
◾ खैराफाटक चौकीवर नियुक्ती केलेल्या कर्मचारी व अधिकारी यांचे बिट हे अनेकदा दुसऱ्या ठिकाणी दाखवले जाते. याअगोदर झालेल्या कारवाई मध्ये पोलीस चौकीवर कामकाज करताना त्यांची कागदोपत्री नियुक्ती ही इतर ठिकाणी असल्याचे दिसून आले होते. याचे कारण म्हणजे जर चौकीवर पोलीसांची काही तक्रार नागरिकांने केली तरी चौकशी मध्ये कागदपत्री इतर ठिकाणी कामकाज करत असल्याचे दाखवून कारवाई मधुन बचाव केला जाऊ शकतो.