◾ बोईसर पुर्वेकडील गौणखनीज पुरवठादार करतात शासनाची फसवणूक; महिन्याला कोट्यवधी रूपयाचा जिएसटी कर बुडवला जातोय
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
पालघर: तालुक्यातील बोईसर पुर्वेकडे असलेल्या गौणखनीज पुरवठादारांनी कोट्यवधी रुपयाच्या कराचे शासनाचे नुकसान केले आहे. दगड, खडी व इतर गौणखनीज पुरवठा करताना जिएसटीची रक्कम चुकविण्यासाठी कच्च्या बिलाचा उपयोग केला जात आहे. सर्रासपणे प्रतिदिनी शासनाचा महसूल बुडवला जात असला तरी प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. सर्वसामान्य नागरिकांना सेवा कर लावून ज्या प्रमाणे वसुल केला जातो त्यातुलनेत बोईसर भागातील गौणखनीज पुरवठादार महिन्याला कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून देखील त्याकडे सरकारचे असलेले दुर्लक्ष आश्चर्यकारक आहे.
बोईसर पुर्वेकडील नागझरी, लालोंडे, निहे, गुंदले या सर्व भागात मोठ्या प्रमाणात दगड खाणी व क्रशर प्रकल्प उभारले आहेत. याभागात साधारण 50 पेक्षा अधिक लहान मोठ्या खदानी असून यातील काही बेकायदेशीर देखील सुरू आहेत. यातच याभागात साधारण 12 क्रशर प्रकल्प असून याठिकाणावरून दिवसाला एक क्रशर वरून सरासरी 30 गाड्या भरल्या तरी 360 गाड्या गौणखनीज वाहतूक केली जाते. तसेच याठिकाणी असलेले बडे व्यावसायिक, इतर आरएमसी व डांबर प्रकल्पात लागणारे गौणखनीज यानुसार सरासरी 200 गाड्या अशा एकुण 560 गाड्या गौणखनीज पालघर जिल्ह्यासह मुंबई पर्यंत पाठवले जाते. मात्र क्रशर, खदानी वरून वाहन भरून निघताना त्यासोबत कोणत्याही प्रकारचे जिएसटीचे बिल नसते. फक्त छोट्याशा चलनावर वाहन नियोजित स्थळी पाठवले जाते. तरी देखील आजवर एकदाही जिएसटी विभागाने कारवाई देखील केलेली नाही.
जिएसटी कर नियमानुसार गौणखनीज वाहतूक करताना त्यासोबत वाहनात असलेल्या गौणखनीजाचे बिल असणे बंधनकारक आहे. मात्र शासनाचा महसूल बुडविण्यासाठी त्याकडे गौणखनीज पुरवठादार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. तारापूर औद्योगिक क्षेत्रात व इतर बोईसर भागात सुरू असलेल्या विविध बांधकाम कामासाठी मोठ्या प्रमाणात गौणखनीज पुरवठा रोजच होतो. क्रशर मालक गौणखनीज पुरवठा करताना कोणत्याही प्रकारचे जिएसटीचे बिल सोबत देत नाहीत. महिन्याला जर समोरील व्यक्तीला जितक्या रक्कमेचे बिलाची आवश्यकता असते त्याच रक्कमेचे बिल दिले जाते. बाकी रक्कम ही गैरमार्गाने दिली जात असुन याठिकाणी रोख रक्कमेचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात. यामुळे महिन्याला कोट्यवधी रूपयाचा महसूल फक्त या नागझरी, लालोंडे, निहे, गुंदले भागातून चोरी होत असला तरी संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्षच आहे.
◾ कसा होतो नागझरी भागात ब्लॅक व्यवहार
क्रशर मालक हे रोजचे लाखो रूपये रोकड स्वरूप घेत असून शासनाला दाखविण्यासाठी काही व्यवहार कागदोपत्री जिएसटी बिलावर ते देखील महिन्या काठी केले जातात. केंद्र शासनाने कँशलेस प्रणाली राबवली असताना देखील याठिकाणी लाखो रूपये ब्लॅक स्वरूपात जमा केले जातात. याठिकाणी महिन्यांमध्ये प्रत्येक शनिवारी रोकड रक्कम वसुली केली जाते. जमा केलेली रक्कम ही आपल्या तिजोरीत जमा होत असली तरी बँकेच्या खात्यावर मोजकीच रक्कम जमा होत असल्याने शासनाचा मोठा महसूल बुडवला जातो.
◾कसे पकडता येईल जिएसटी चोरांना
दगड खाणीतून आणलेला दगडाची स्वामित्वधन परवानाच्या पावत्या महसूल विभागाकडे जमा केल्या नंतर क्रशर मालकांना खडी व क्रशसँड ची स्वामित्वधन(राँयल्टी) मिळते. यानुसार शासन नोंदणी नुसार किती गौणखनीज पुरवठा केला याची माहिती सहज मिळू शकेल आणि चोरट्यांना पकडता येईल. मात्र याठिकाणी राँयल्टी बुडवून देखील मोठ्या प्रमाणात गौणखनीज पुरवठा केला जातो. यामुळे प्रशासनाने आला महसूल वाचवण्यासाठी तपासणी मोहीम घेणे गरजेचे आहे.