खुपरी येथील केमिकलयुक्त बनावट डिझेल प्रकरण भोवल्याची चर्चा; दशरथ पाटील यांच्यावर वाड्याची जबाबदारी
पालघर दर्पण: वार्ताहर
विक्रमगड: वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर संखे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून संखे यांच्या कार्यकाळात घडलेल्या अनेक गुन्ह्यांची उकल बाहेरील पोलीसांनी केल्याने हेच प्रकार त्यांना भोवल्याचे बोलले जात आहे.
वाडा तालुक्यातील खुपरी येथे साईओम पेट्रो या कारखान्यात केमिकलयुक्त बनावट डिझेल बनविले जात असून याबाबत सोलापूर पोलिसांनी कारवाई करून करोडो रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. याआधी वाड्यात भंगारचोरी, बनावट सॅनिटायझर अशा विविध गंभीर गुन्ह्यात बाहेरील पोलीसांनी कारवाई करून वाड्यातील अवैध व्यवसायांना आळा घालण्याचे काम केले होते. या सर्व प्रकारांमुळे वाडा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर साहजिकच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून याचाच एक भाग म्हणून अल्पावधीतच वाडा पोलीस निरीक्षक सुधीर संखे यांची तातडीने बदली करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
वाडा पोलीस ठाण्याची धुरा आता नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक दशरथ पाटील हे सांभाळणार असून डहाणू येथून आलेले ते धडाकेबाज अधिकारी असल्याने वाड्यातील अवैध गुन्ह्यांना ते नक्कीच आळा घालतील असा विश्वास लोकांनी व्यक्त केला आहे.