◾ कामाचे कोटेशन रद्द झाले म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे कारखान्यांची तक्रार; कारखाना गेटवर जावून केला गुंडांनी राडा
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रात राजकीय पाठबळामुळे गावगुंडांनी हैदोस घातला असून प्रदूषणाचे कारण पुढे करत कारखान्यांना वेठीस धरले जात आहे. विशेष म्हणजे कारखान्यात विविध कंत्राटे मिळविण्यासाठी तसेच आपला प्रभाव राखण्यासाठी कारखान्यांच्या परीसरात शिरून कामगारांना मारहाण करण्यापर्यंत या गुंडाची मजल गेली आहे. मात्र असे असले तरी राजकीय पाठबळामुळे अशा गुंडगिरी करणाऱ्यांना मोकळीक मिळत असल्याचे दिसून आले आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील साळवी केमिकल्स लिमिटेड या कारखान्यात १२ आँक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास काही गुंडांनी जबरदस्तीने प्रवेश करून तेथील कामगारांना बेदम मारहाण करीत धुमाकूळ घातल्याची घटना उघड समोर आली आहे. हा सर्व प्रकार कारखान्याच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.१२ ओक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास साळवी केमिकल्स या कारखान्यात ४ ते ५ गुंडांनी नंबर प्लेट नसलेल्या कार व मोटरसायकलवर येऊन इटीपी प्लांटचे कुलूप खोलण्यास सांगितले परंतु कारखाना रखवालदार आणि कामगार यांनी नकार दिल्याने त्यांना गुंडाकडून बेदम मारहाण करण्यात आली व जबरदस्तीने इटीपी प्लांटचे कुलूप तोडून कारखान्यांच्या आवारात कामगारांना आवारात मारहाण व शिवीगाळ करीत धुमाकूळ घालीत असल्याचे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यातील कामगार,भंगार,ट्रान्सपोर्ट व इतर कामांचा ठेका मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा असून यातूनच गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून कारखान्यांचे मालक व व्यवस्थापन यांना धमकावले जात आहे. त्यामुळे तारापूरमधील वाढत्या प्रदूषणासोबतच औद्योगिक परीसरातील वातावरण देखील बिघडत चालले आहे. गुंडांच्या या दहशतीला कंटाळून अनेक जण आपले कारखाने इतर राज्यात स्थलांतरीत करीत असल्याने कारखानदार आणि कामगार यांना संरक्षण देऊन या गंभीर समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी कारखानदारांनी केली आहे.
◾साळवी केमिकल्स या कारखान्यात १२ ओक्टोंबरच्या रात्री काही गुंडांनी मारहाण करून हैदोस घातल्यानंतर ४ दिवसानंतर संबंधित या घटनेतील अमरसिंग व अभिषेक सिंग व इतर व्यक्तींनी साळवी कंपनीच्या व्यवस्थापनाशी कंपनीत ठेका व इतर कामे देण्याची मागणी करत ती पूर्ण न केल्यास कंपनीवरोधात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व इतर विभाग यांच्याकडे तक्रारी करण्याची धमकी दिली. याच दिवशी काही वेळानंतर कंपनीतील कामगार व संबंधित इसम यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा प्रकार पुन्हा घडला व कंपनीच्या कामगाराविरोधात बाहेरून आलेल्या इसमानी बोईसर पोलिस स्टेशन येथे मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.