◾️बोईसर मध्ये माजी ग्रामपंचायत सदस्यांच्या बेकायदेशीर कामांकडे प्रशासनाने दुर्लक्ष
◾️कुपनलिकेतुन बेकायदेशीर पाणी उपसा; औद्योगिक क्षेत्रात केला जातोय चोरटा पाणीपुरवठा
पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: शिवसेनेचा माजी ग्रामपंचायत सदस्य असलेल्या एकांने राजकीय पाठबळामुळे नैसर्गिक नाला देखील गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला आहे. यातच याठिकाणी नियमबाह्य वाहनांचे वाँशिंग सेंटर टाकले असून याठिकाणी अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. यातच तारापुर औद्योगिक क्षेत्रात बेकायदेशीर टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी सक्रिय असलेल्या या महाशयांवर प्रशासन देखील मेहरबान असल्याचे दिसून येत आहे.
बोईसर-तारापूर मुख्य रस्त्याजवळ नैसर्गिक नाल्यालगत बेकायदा बांधकाम करून गाड्या धुण्याचे अनधिकृत वॉशिंग सेंटर गेली अनेक वर्षे सुरू आहे. सिडको वसाहतीजवळ प्लॉट क्र आर-१ या जागेवर शिवसेनेचे माजी ग्रामपंचायत सदस्य अजय ठाकूर यांनी नैसर्गिक नाल्यावर भराव टाकून नाल्याचे पात्र अरुंद करून हे बेकायदेशीर कामकाज सुरू ठेवले आहे. येथील वाशिंग सेंटर गाड्या धुताना गाडीमधील पेट्रोल,डिझेल,ऑईल,आणि ल्युब्रिकंट्स सारखे ज्वलनशील आणि तेलजन्य पदार्थ थेट नाल्यात सोडले जात आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी तारापूर एमआयडीसीमधील केमिकल्सची वाहतूक करणारे टँकर देखील धुतले जात असल्याचा आरोप नागरिकांन कडून केला जात आहे. नाल्याच्या प्रदूषणात प्रचंड वाढ होऊन सिडको वसाहतीमधील राहीवाश्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. बोईसर तारापुर मुख्य रस्त्यावर बांधकाम झालेले असताना देखील सदरचे बांधकाम होत असताना सिडको, महसूल विभाग व एमआयडीसी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
तारापुर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक व इतर कारखान्यांना टँकरने पाणीपुरवठा करणे बंदी असताना देखील. ठाकूर यांचे टँकर बेकायदेशीर पणे चोरट्या पध्दतीने औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना पाण्याचा पुरवठा करतात. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने याबाबत अनेकदा पालघर जिल्हाधिकारी यांच्या कडे लेखी अहवाल दिला असताना देखील आजवर अशा टँकर माफियांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. प्रशासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना देखील याठिकाणी कुपनलिकेतुन दररोज लाखो लिटर पाण्याचा उपसा केला जात आहे. मात्र शिवसेनेचा माजी सदस्य असलेल्या ठाकुर महाशयांवर प्रशासन कोणाच्या दबावामुळे दुर्लक्ष करते असा सवाल उपस्थित केला जात आहे. येथील बेकायदेशीर बाबींवर कारवाई होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते गजानन देशमुख यांनी जिल्हाधिकारी पालघर यांच्या कडे तक्रार दाखल केली आहे.
◾️ अनधिकृत बांधकामे व टँकर मफिया असलेल्यांना शिवसेनेचे पाठबळ मिळत असल्याने प्रशासन देखील कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत असल्याचा आरोप बोईसर वासीयांन कडून केला जात आहे. बोईसर ग्रामपंचायत मध्ये विरोधी बाजूला बसलेल्या व आता माजी असलेल्या लोकप्रतिनिधी यांनी सोईस्कर राजकारण करत सत्ताधारी यांना अनेक प्रकरणात विरोध केला होता. मात्र कालांतराने आपली देखील अनधिकृत कामे झाकण्यासाठी सत्ताधारी यांच्या विषयी असलेला आक्रोश शिवसेनेच्या नेत्यांचा कमी झालेला दिसून आला आहे.