◾️बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घेतले चौकशी साठी ताब्यात; गंडा घालणाऱ्या पदाधिकाऱ्यांला सोडविण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांचा दबाव
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या असलेल्या शिवसेनेच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर कोट्यवधी रूपयाचा गंडा घातल्याच्या आरोपावर स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटने ताब्यात घेतले आहे. कारखान्याच्या भंगार प्रकरणात आर्थिक फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे गंडा घालणाऱ्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांला सोडवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिट बाहेर शिवसेनेच्या नेत्यांनी व कार्यकर्तांनी बेकायदेशीर गर्दी करून दबावतंत्र सुरू ठेवले होते.
शिवसेना युवासेनेचा पालघर विधानसभा उपजिल्हा प्रमुख सुमित पिंपळे यांने एका कारखानदाला 1 कोटी 28 लाखाचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. भंगार प्रकरणात फसवणूक झाल्यामुळे एका उद्योजकांने बोईसर स्थानिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. शुक्रवारी दुपारच्या वेळी चौकशी साठी स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटने ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरा पर्यंत सुरू असलेल्या चौकशी दरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चौकशी मध्ये हस्तक्षेप करत याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. खात्रीशीर सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचे फोन बोईसर मध्ये आले असल्याचे समोर आले आहे. सत्तेवर असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू ठेवले असले तरी कायदेशीर होणाऱ्या कारवाई मध्ये तडजोड होते की, गुन्हा दाखल केला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोट्यवधी रूपयाच्या फसवणुकी बाबत तक्रार दाखल असताना देखील आजवर गुन्हा दाखल झालेला नसून राजकीय दबावाखाली पोलिस नेमका काय तपास करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. बोईसर मध्ये एखाद्या बड्या कार्यकर्तांने केलेल्या गुन्ह्यातुन सुटका करण्यासाठी डजनभर नेते जमा होण्याची प्रस्था असल्याने नेहमी प्रमाणे तडजोड अंती सुटका होणार की, स्थानिक गुन्हे शाखा आपल्या आक्रमक कामकाजाच्या शैलीत फसवणूक करणार्यांना कायद्याच्या चौकटीत आणणार हे पाहणे औचित्यांचे ठरणार आहे. यातच बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालया बाहेर शिवसेनेचे बोईसर विधानसभा संघटक निलम संखे, शहर प्रमुख मुकेश पाटील यांच्या सह मोठ्या संखेने कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रकरणात अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी माहिती गुन्हा दाखल केल्यानंतर दिली जाईल असे सांगितले.