◾️ बोईसर माजी ग्रामपंचायत सदस्य अजय ठाकुरांचे अनधिकृत बांधकामाला राजकीय पाठबळ; चौकशी साठी आलेले महसूल विभागाचे अधिकारी हतबल
पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी बोईसर भागात अनधिकृत बांधकामे जोमाने सुरू केली असून त्याला स्थानिक एक दोन उरलेले नेते पाठबळ देताना दिसत आहेत. बोईसर तारापुर मुख्य रस्त्यावर सिडको येथे एका माजी ग्रामपंचायत सदस्यांने अनधिकृत केलेल्या बांधकामाला वाचवण्यासाठी नेत्यांनी याठिकाणी हजेरी लावत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला आहे. यातच राजकीय दबावाखाली येणाऱ्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची ठोस भुमिका न घेताच माघारी परतले आहेत.
बोईसर भागात अनधिकृत बांधकामे झपाट्याने वाढत चालले असून महसूल व ग्रामपंचायत देखील अनधिकृत बांधकामा कडे दुर्लक्ष करत आहे. यामुळेच बोईसर तारापूर मुख्य रस्त्यावर ग्रामपंचायत सदस्य असताना शिवसेनेचे अजय ठाकूर यांनी अनधिकृत गाळ्यांचे बांधकाम केले होते. यानंतर पुन्हा एक गाळा बांधकाम करत रस्त्यालगत असलेली जागा हडप करण्याचा प्रयत्न केला आहे. यातच याठिकाणी नैसर्गिक नाल्यावर देखील बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात कुपनलिकेतुन बेकायदेशीर पाण्याचा उपसा केला जात असल्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्ते गजानन देशमुख यांनी याबाबत पाठपुरावा केल्या नंतर पालघर तहसीलदार यांनी अनधिकृत बांधकामाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
तहसीलदार यांच्या आदेशानुसार बोईसर मंडळ अधिकारी मनिष वर्तक व त्यांचा फौजफाटा 21 डिसेंबर 2021 रोजी सिडको येथील अनधिकृत बांधकाम केलेल्या ठिकाणी दाखल झाला होता. याचवेळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी शिवसेनेचे बोईसर मधील पदाधिकारी याठिकाणी अगोदर पासुनच ठाण मारून बसले होते. शिवसेना बोईसर शहर प्रमुख मुकेश पाटील व त्यांच्या सोबत काही लोकांनी जमाव करून महसूल विभागाला आपली ताकद दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता. यातच महत्त्वाचे म्हणजे माजी उपसरपंच व अनधिकृत बांधकामासाठी सत्ताधारी पक्षाला धारेवर धरणारे निलम संखे देखील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या अजय ठाकूर यांच्या पाठीशी उभे राहिले होते. यामुळे बोईसर मध्ये शिवसेना नेत्यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई होऊ नये याठिकाणी केलेला केविलवाणा प्रयत्नावर सर्वच स्थरातुन टिका केली जात आहे.
◾️ अनधिकृत गाळे बंद ठेवत काढले फलक
महसूल विभागाचे अधिकारी अजय ठाकूर यांच्या अनधिकृत बांधकामाची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यादिवशी येथे सुरू केलेली दुकाने बंद ठेवण्यात आली. तसेच दुकानावर लावलेले फलक देखील हटविण्यात आले होते. मात्र सायंकाळी पुन्हा फलक लावून बेकायदेशीर उभारलेल्या गाळ्यात दुकाने सुरू करण्यात आली.
◾️ बोईसर महसूल विभागाचे तलाठी याभागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असताना देखील जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांन कडून केला जातो. एखाद्या प्रकरणात तक्रार केल्यानंतर अनधिकृत बांधकामाचा अहवाल सादर केला जातो. यामुळे महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
◾️ तक्रारदार व अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे दोघांचे म्हणणे ऐकून अहवाल तहसीलदार यांच्या कडे सादर केला जाईल.
— मनिष वर्तक, मंडळ अधिकारी बोईसर