◾️वाड्याचे जंगल नष्ट करण्याचा विराज प्रोफाईलचा घाट; शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी घेवून वनक्षेत्रातील जागा केली बिनशेती
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
पालघर: तारापुरात औद्योगिक क्षेत्रात प्रदूषणाचा उच्चांक गाठलेल्या विराज प्रोफाइल कारखान्यांने आता वाडा तालुक्यातील आमगाव येथे आपले कारखाने उभे करण्याची तयारी केली आहे. अतिशय घनदाट जंगल असलेल्या भागात कोट्यवधी झाडे नष्ट करून हा कारखाना उभारण्याची सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून वनविभागाच्या व इतर सर्व विभागाच्या परवानग्या जंगल असलेल्या भागात कारखाना उभारण्यासाठी घेतल्या असल्या तरी पर्यावरणाचे टाओ फोडणारे राज्य सरकारमधील युवा मंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांन कडून केली जात आहे.
विराज प्रोफाइल उद्योजकांने काही वर्षांपूर्वी वाडा यांच्या येथील इनाम असलेली सुमारे 650 एकर जागा येथील एका जमीनदारा कडून कोट्यवधी रूपयांना विकत घेतली होती. यानंतर याठिकाणी लोखंडावर प्रक्रिया करणारा उद्योग उभारत्यासाठी याठिकाणी जागेच्या सपाटीकरणाचा काम गेल्या वर्षभरापासून घेण्यात आले होते. बोईसर येथील एका उद्योजकाला त्याचा ठेका देण्यात आला. यानंतर बोईसर भागातील शिवसेनेच्या एका ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी यांने येथील उद्योजकांच्या मदतीने मौजे. आमगाव, खिंडीचा पाडा याभागात कोहोज किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जागेवर सपाटीकरण सुरू केले. जुलै 2021 मध्ये भर पावसाळ्यात देखील लाखोंच्या घरात वृक्षतोड करून जागेचे सपाटीकरण करण्यात आले. याबाबत सर्वप्रथम राजतंत्र व पालघर दर्पण समुहाने वृत्त प्रसिद्ध करून हा विषय सर्वांन समोर आणला होता. मात्र वरिष्ठ स्थरावरून आणलेल्या परवानगी बाबत स्थानिक पातळीवर तपासणी न करताच जिल्हा प्रशासनाने येथील साधारण 250 एकर जागा बिनशेती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शिवसेना भाजपचे सरकार असताना असलेले महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या कार्यकाळात या जागेची फाईल पुढे सरकली असल्याचे बोलले जात आहे. याच प्रकरणात सामाजिक कार्यकर्तां अंजली दमानिया यांनी देखील एकनाथ खडसे विरोधात रान उठविण्यासाठी वाडा येथील विराज प्रोफाईलने घेतलेल्या जागेची पाहणी येथील स्थानिक पत्रकारांच्या मदतीने केली होती. या जागेवर अनेक स्थानिक आदिवासी लोकांची वर्षानुवर्षे कसत असलेली शेती असून काही प्रमाणात घरे देखील बांधण्यात आले आहेत. विराज प्रोफाइल कडून सत्ताधारी राजकीय पक्षांच्या बोईसर येथील नेत्यांना हाताशी घेवून जागेवर कब्जा असलेल्या लोकांना हटविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र संपूर्ण पर्यावरण उद्ध्वस्त होणार असल्याने स्थानिकांनी देखील येथील होऊ घातलेल्या प्रदुषणकारी कारखान्याला विरोध दर्शविला असून दोन दिवसापूर्वीच जिजाऊ सामाजिक संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या बैठकीत याठिकाणी राहत असलेले स्थानिक एकत्रित आले होते.
◾️विराज प्रोफाइल उद्योजकांने कोहोज किल्ल्याच्या पायथ्याशी सुमारे 650 एकर जागा घेतली असून यातील निम्म्या पेक्षा अधिक जागा बिनशेती करण्यात वनविभागाने परवानगी देखील दिली आहे. महाराष्ट्र शासना कडून वनविभागाची परवानगी मिळण्यासाठी भोपाळ येथे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार उद्योग धंद्याच्या वापरासाठी साधारणपणे 250 एकर जागेसाठी केंद्र सरकारच्या वनविभागाने बिनशेती साठी परवानगी दिल्याचे समोर आले आहे. विराज प्रोफाइल उद्योजकांने घेतलेल्या 650 एकर जागेमधील साधारणपणे 80 एकर जागेवर वाडा- मनोर महामार्गाला लागून आमगाव या ग्रामपंचायतीच्या हद्दीत गेल्या सह महिन्यांन पासून बेसुमार वृक्षतोड व मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू करण्यात आले होते.