◾️उत्तरेकडून आलेल्या धुळीकामुळे पालघर, डहाणू, बोईसर, सफाळे परिसरातील गाड्यांवर वस्तूंवर पांढरे डाग
पालघर दर्पण: प्रतिनिधी
पालघर: पाकिस्तानमधील धुळीच्या वादळाचा मुंबईसह पालघरच्या वातावरणावर परिणाम दिसून येत असून या संपूर्ण भागात सकाळपासून शहरांमधील दृश्यमानता अतिशय कमी झाली आहे. तर हवेमध्ये धुळीचे कण मिसळल्याने त्यात काल आणि आज पाऊस पडल्याने अनेक गाड्यांवर आणि वस्तूंवर पांढरे डाग दिसून येत आहेत. अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उत्तरेकडील पाकिस्तानच्या कराची मध्ये धुळीचे वादळ आले होते. आता हे वादळ राजस्थान आणि गुजरातच्या दिशेने सरकत आहे. गुजरात मार्गे आलेल्या धुळीचे साम्राज्य गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र पसरले असून त्यामुळे वातावरण प्रदूषित झाले. गेल्या काही दिवसांपासून निसर्गाने थंडी, पावसाची बरसात सुरु केली आहे. गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रासह देशभरात कुठे दाट धुके, कुठे अवकाळी पाऊस तर कुठे कडाक्याची थंडी पडत आहे. रविवारी 23 जानेवारी रोजी पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. यामुळे कोकणात पाऊस तर मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आज थंड वारे सुरु झाले आहेत. यामुळे उ. कोकण आणि म. महाराष्ट्रात दृष्यमानता कमी झाली आहे.
मुंबईसह पालघर मधील डहाणू, बोईसर, सफाळे परिसरातील गाड्यांवर वस्तूंवर पांढरे डाग पडलेले दिसून आले. गाडी साफसफाई केल्यानंतर काही वेळातच पुन्हा तशाच प्रकारे पांढरे डाग पडत असल्याने नागरीकांन कडून चिंता व्यक्त केली जात आहे. यातच मुंबई – पुण्यात धुलीकणांचे प्रमाण वाढल्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे वाहन चालविताना चालकांनी तसेच श्वसनाचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे. हे धुळीचे वादळ असल्याने पाकिस्तानातून आलेले धुलीकण हवेत पसरले आहेत. यामुळे समोरचे दिसणे कमी झाले आहे. शिवाय अधूनमधून ढगही ये-जा करत आहेत. यामुळे सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणावर जमिनीवर पडत नसुन यामुळे दृष्यमानता कमी झाली आहे.
मुंबईतील हवा गुणवत्ता पातळी खालवली
मुंबईतील एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक 180 वर
असून हवा गुणवत्ता पातळी खालवल्याचं दिसून येत आहे. मालाड आणि माझगावमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक 300 पार झाला आहे. दोन्ही ठिकाणी हवेची गुणवत्ता अति खराब श्रेणीत, मालाडमध्ये एक्यूआय 316 तर माझगावमध्ये 315 एक्यूआय आहे.